
फ्रान्सने आपल्या विमानवाहू युद्धनौका तुकडीला लाल समुद्राच्या दिशेने रवाना केले आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील सागरी सुरक्षेसाठी संभाव्य मोहिमेची तयारी सुरू केली आहे. फ्रेंच लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, ‘शार्ल द गॉल’ ही अणुऊर्जेवर चालणारी विमानवाहू युद्धनौका इटली आणि नेदरलँड्सच्या युद्धनौकांसह दक्षिण लाल समुद्राकडे मार्गक्रमण करत आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही हालचाल जागतिक राजकारणात अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सांगितले की, ही मोहीम फ्रान्स आणि ब्रिटन यांच्या संयुक्त पुढाकाराचा भाग आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील व्यापारी जहाजांच्या सुरक्षित मार्गासाठी बहुराष्ट्रीय संरक्षण व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युद्धजन्य परिस्थिती निवळल्यानंतर या मोहिमेला प्रत्यक्ष सुरुवात होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले. या सुरक्षिततेमुळे जहाजमालक आणि विमा कंपन्यांचा विश्वास पुन्हा निर्माण होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास फ्रान्सने व्यक्त केला आहे.
होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील अत्यंत महत्त्वाची तेलवाहतूक जलवाहिनी मानली जाते. इराणमधील संघर्षानंतर या मार्गावरील वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला असून जागतिक ऊर्जा बाजारपेठेवर त्याचे गंभीर परिणाम होत आहेत. सध्या अनेक तेलवाहू जहाजे अडकून पडली असून विमा दरांमध्येही मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने या सद्यस्थितीला जागतिक तेलपुरवठा व्यवस्थेतील एक मोठा धक्का असे संबोधले आहे.
फ्रान्सची ‘शार्ल द गॉल’ ही युरोपातील एकमेव अणुऊर्जेवर चालणारी विमानवाहू युद्धनौका आहे. या ताफ्यात फ्रेंच युद्धनौका, हल्लेखोर पाणबुडी, रसद पुरवठा जहाज तसेच मित्रदेशांच्या नौदलांचा समावेश आहे. फ्रान्सने यापूर्वीही मध्यपूर्व भागात अतिरिक्त युद्धनौका पाठवून सागरी मार्गांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका घेतली होती. या ताज्या मोहिमेमुळे युरोपियन देशांची मध्यपूर्वेतील सामरिक उपस्थिती अधिक मजबूत होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ या मोहिमेपासून फ्रान्सने स्वतःला वेगळे ठेवले आहे. फ्रान्स आणि ब्रिटन यांचा प्रस्तावित उपक्रम हा युद्धात थेट हस्तक्षेप करण्याऐवजी केवळ संरक्षणात्मक आणि सागरी सुरक्षिततेवर आधारित असल्याचे इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी स्पष्ट केले. या संदर्भात त्यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशीही चर्चा केली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राजनैतिक स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचेही सांगितले जात आहे.