
राज्यात ऑक्टोबर २०२५ ते एप्रिल २०२६ या काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या संकटात बळीराजाला आधार देण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या नुकसानीचा आढावा घेण्यात आला आणि मदत निधीचे वाटप करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
२०२५ च्या शेवटच्या तिमाहीत, म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने राज्याच्या अनेक भागांत थैमान घातले होते. या पावसामुळे सुमारे एक लाख चौदा हजार सातशे बावन्न हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, या नुकसानीपोटी एक लाख ऐंशी हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना एकशे अठ्ठावीस कोटी पासष्ट लाख रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. हे नुकसान प्रामुख्याने चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नाशिक, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत झाले होते. फळबागा आणि रब्बीच्या सुरुवातीच्या पिकांना या पावसाने फटका दिला होता.
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाही अवकाळी पावसाचे संकट कायम राहिले. जानेवारी ते मार्च २०२६ या काळात झालेल्या पावसाने राज्यातील दोन लाख तेहत्तीस हजार आठशे नव्वद शेतकऱ्यांना बाधित केले. या काळात सुमारे एक लाख पंचेचाळीस हजार सहाशे सहा हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले. यात प्रामुख्याने,केळी, पपई, आंबा, द्राक्षे, कांदा, गहू, हरभरा, ज्वारी या पिकांचे अतोनात नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीत केवळ पिकांचेच नव्हे, तर जीवितहानी आणि वित्तहानी देखील झाली आहे. या काळात पाच लोकांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत. तसेच छत्तीस जनावरांचाही या पावसामुळे मृत्यू झाला आहे. लातूर, सोलापूर, नाशिक, सातारा, अहिल्यानगर, पुणे आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांना या पावसाने झोडपून काढले आहे.
एप्रिल २०२६ मध्येही पावसाचा जोर कायम असून प्राथमिक अंदाजानुसार एक लाख चौ-याण्णव हजार तीनशे एकोणतीस शेतकऱ्यांच्या एक लाख बावीस हजार नऊशे त्र्याण्णव हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. जानेवारीपासून झालेल्या या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी आणि सिंचन प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यावर मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत विशेष भर दिला आहे. अवकाळीच्या संकटात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.