हरित शाळा उपक्रमाला पुण्यात सुरुवात
पुणे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक शिक्षण देण्यासाठी आणि निसर्गाच्या सानिध्यात त्यांचा विकास घडवण्यासाठी ‘हरित शाळा’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शाळांना थेट पर्यावरणाशी जोडून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यावर विशेष भर दिला जात आहे. यामुळे ग्रामीण भागातील शैक्षणिक वातावरणात सकारात्मक बदल घडत आहेत.
‘शाश्वत विकास उपक्रम’ अंतर्गत तसेच टाटा ऑटोकाँप सिस्टिम्स प्रा. लि. यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. खेड तालुक्यातील बिरदवाडी, देहूगाव, तोरणे आणि राममळा (कडूस) येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत शाळांमध्ये सौर ऊर्जेचा वापर, पावसाच्या पाण्याचे संकलन, सांडपाण्याचा पुनर्वापर तसेच मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड यांसारख्या उपक्रमांना प्राधान्य दिले जात आहे. केवळ पुस्तकी ज्ञान न देता, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरणाचे महत्त्व समजावे आणि त्यांच्यामध्ये निसर्गाबद्दल प्रेम निर्माण व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शालेय परिसरातच भाजीपाला बाग तयार करणे, विविध औषधी वनस्पतींची लागवड करणे आणि सेंद्रिय शेतीचा प्रत्यक्ष अनुभव दिला जात आहे. या प्रत्यक्ष अनुभवामुळे विद्यार्थी निसर्गाशी घट्ट जोडले जात असून, त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि जबाबदारीची भावना रुजवली जात आहे.
पुणे जिल्हा परिषद प्रशासनाने या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विविध स्तरांवर सूक्ष्म नियोजन केले आहे. शिक्षकांना या विषयाचे विशेष प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता वाढवण्याचे काम सातत्याने सुरू आहे. या माध्यमातून केवळ पर्यावरणाचे रक्षणच होत नाही, तर ग्रामीण भागातील शाळांचा दर्जा उंचावण्यासाठीही मोठे प्रयत्न केले जात आहेत. या ‘हरित शाळा’ उपक्रमामुळे शाळा आता केवळ शिक्षणाचे केंद्र न राहता पर्यावरण संवर्धनाचे एक आदर्श केंद्र म्हणून उदयास येत आहेत. भविष्यात जिल्ह्यातील अधिक शाळांमध्ये हा प्रकल्प राबवण्याचा प्रशासनाचा मानस आहे. विद्यार्थ्यांमध्ये शाश्वत जीवनशैलीची जाणीव निर्माण करण्यासाठी आणि येणाऱ्या पिढीला निसर्गाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.