कोचीमध्ये इराणच्या जहाजाला तांत्रिक बिघाडामुळे आपत्कालीन आश्रय

तांत्रिक बिघाडामुळे अरबी समुद्रात संकटात सापडलेल्या इराणच्या आयआरआयएस लावन या युद्धनौकेला भारताने कोची बंदरात आपत्कालीन आश्रयाची परवानगी दिली आहे. या जहाजावरील एकशे त्र्याऐंशी खलाशांना सुरक्षितरीत्या उतरवण्यात आले असून त्यांच्या राहण्याची सोय भारतीय नौदलाच्या तळावर करण्यात आली आहे.

इराणचे आयआरआयएस लावन हे जहाज विशाखापट्टणम येथे आयोजित इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू आणि मिलन या बहुराष्ट्रीय नौदल सरावासाठी भारतीय समुद्रक्षेत्रात आले होते. मात्र, परतत असताना २८ फेब्रुवारी २०२६ रोजी या जहाजात गंभीर तांत्रिक बिघाड झाला. जहाजाचे इंजिन आणि कार्यप्रणालीत समस्या निर्माण झाल्यामुळे ते समुद्रात भरकटण्याची भीती होती. इराण सरकारने तात्काळ भारताकडे या जहाजाला आश्रय देण्याची विनंती केली. भारताने या विनंतीचा सकारात्मक विचार करून एक मार्च रोजी जहाजाला कोची बंदरात येण्याची परवानगी दिली. त्यानंतर चार मार्च रोजी हे जहाज कोचीच्या मट्टनचेरी धक्क्यावर सुरक्षितपणे दाखल झाले.

काही दिवसांपूर्वीच श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ अमेरिकेच्या एका पाणबुडीने इराणची दुसरी युद्धनौका आयआरआयएस डेना टॉरपीडो हल्ला करून बुडवली होती. आयआरआयएस डेना देखील भारतातूनच परतत असताना तिच्यावर हा हल्ला झाला होता. अशा आंतरराष्ट्रीय तणावाच्या काळात आयआरआयएस लावनला आश्रय दिला आहे. कोचीमध्ये दाखल झालेल्या या आयआरआयएस लावन मधील एकशे त्र्याऐंशी खलाशांना भारतीय नौदलाच्या कोची येथील तळावर निवारा देण्यात आला आहे. जहाजाच्या तांत्रिक बिघाडाची पाहणी भारतीय नौदलाचे तज्ज्ञ आणि इराणचे तंत्रज्ञ करत आहेत. जहाजाची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत हे जहाज कोची बंदरातच राहण्याची शक्यता आहे. बंदराच्या परिसरात आणि जहाजाभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. भारताचा हा निर्णय पूर्णपणे मानवतावादी दृष्टिकोनातून घेण्यात आला आहे. “जेव्हा एखादे जहाज तांत्रिक अडचणीत असते, तेव्हा त्यांना मदत करणे हे सागरी नियमांनुसार आमचे कर्तव्य आहे, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर स्पष्ट केले आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
431 वेळा पाहिलं