कृषीवृद्धीसाठी महाबीजची नवी उत्पादने

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते चार नाविन्यपूर्ण कृषी उत्पादनांचे लोकार्पण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांनी फक्त उच्च दर्जाचे बियाणे पुरवणे एवढ्यापुरतेच मर्यादित राहू नये. त्यांना सेंद्रिय शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे हे शासनाचे मुख्य ध्येय आहे. ही नवीन उत्पादने शेतीचा खर्च कमी करून उत्पादन वाढवण्यास आणि मातीचे आरोग्य जपण्यास अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

महाबीजने प्रथमच खाजगी कंपन्यांच्या स्पर्धेत उतरून भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राच्या सहकार्याने प्रगत तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामध्ये निमास्त्र नावाचे अतिसूक्ष्म निंबोळी चूर्ण तयार करण्यात आले असून, ते पिकांवरील किडींचे नैसर्गिकरीत्या नियंत्रण करण्यास सक्षम आहे. हे उत्पादन सेंद्रिय शेती करणाऱ्या बांधवांसाठी वरदान ठरणार असून, अत्यंत रास्त दरात सर्वत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यासोबतच रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होण्यास मदत होईल. जमिनीचा कस वाढवण्यासाठी महाबीजने महास्पीड आणि कर्बमापक संच बाजारात आणले आहेत. ‘महास्पीड’ हे उत्पादन शेतातील ओल्या कचऱ्याचे आणि पिकांच्या अवशेषांचे अतिशय वेगाने दर्जेदार सेंद्रिय खतात रूपांतर करते. दुसरीकडे, कर्बमापक संचामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही विशेष प्रशिक्षणाशिवाय स्वतःच्या शेतात मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण त्वरित तपासता येणार आहे. याशिवाय पिकांच्या मुळांचे बुरशीपासून संरक्षण करण्यासाठी एका जैविक बुरशीनाशकाची देखील निर्मिती करण्यात आली आहे.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी यावर्षी एक विशेष क्रांतिकारी वाण विकसित करण्यात आले आहे. या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे याची फुले पांढऱ्या रंगाची असून, याचे दाणे अत्यंत आकर्षक आहेत, ज्यामुळे बाजारात चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. हे पीक साधारणपणे पंच्याण्णव ते शंभर दिवसांच्या कालावधीत तयार होते आणि प्रति हेक्टरी दहा ते बारा क्विंटल इतके उत्पादन देण्याची याची क्षमता आहे. यंत्राच्या सहाय्याने काढणी करण्यासाठी हे वाण अत्यंत सोयीचे असल्याचे सांगण्यात आले आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाबीजने घेतलेले हे निर्णय शेती क्षेत्रासाठी ऐतिहासिक मानले जात आहेत. ही सर्व उत्पादने आजपासून राज्यातील सर्व केंद्रांवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. कमी खर्चात अधिक उत्पन्न, जमिनीची सुपीकता आणि शाश्वत शेतीचा मार्ग या उत्पादनांमुळे मोकळा झाला आहे. यामुळे बळीराजा अधिक सक्षम होऊन राज्याच्या कृषी विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
643 वेळा पाहिलं