मुंबईला लाभल्या पहिल्या महिला आयुक्त

मुंबई महानगरपालिकेच्या दीडशे वर्षांहून अधिक काळाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला अधिकाऱ्याकडे आयुक्तपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. ज्येष्ठ सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांनी ३१ मार्च २०२६ रोजी मुंबई महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते आयुक्त भूषण गगराणी यांच्या सेवानिवृत्तीनंतर राज्य सरकारने भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. १९९५ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या अश्विनी भिडे मूळच्या सांगली जिल्ह्यातील आहेत. त्यांनी यूपीएससी परीक्षेत देशात नववा आणि महिलांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यांच्या प्रशासकीय प्रवासाची सुरुवात कोल्हापुरातून झाली. त्यांच्या कारकीर्दीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुंबई मेट्रो रेल महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी केलेले काम. मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोच्या अंमलबजावणीत त्यांनी तांत्रिक आणि प्रशासकीय पातळ्यांवरील आव्हाने अत्यंत धडाडीने पेलली.

अश्विनी भिडे यांनी आजवर विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. नागपूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी राबवलेला जलसंधारणाचा प्रयोग आजही विदर्भात अश्विनी बंधारे म्हणून ओळखला जातो. एमएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणून मुंबईतील अनेक उड्डाणपूल आणि रस्ते विकास प्रकल्पांत त्यांचा सहभाग होता. मुंबई महापालिकेत २०२० ते २०२४ दरम्यान त्यांनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. विशेषतः कोविडच्या संकटकाळात त्यांनी पूर्व उपनगरांमध्ये केलेले नियोजन प्रभावी ठरले होते. सागरी किनारा रस्ता प्रकल्पामध्येही त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मुंबईकरांचे जीवन सुसह्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्यासमोर सध्या काही तातडीची आव्हाने आहेत. यंदा मुंबई तुंबणार नाही, याची खात्री देते, असे आश्वासन देत त्यांनी नालेसफाईच्या कामांना गती देणार असल्याचे स्पष्ट केले. मुंबईतील सुरू असलेले रस्ते काँक्रिटीकरण आणि सौंदर्यीकरणाचे प्रकल्प वेळेत पूर्ण करणे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महिलांसाठी अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर करण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
6,377 वेळा पाहिलं