
मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत शनिवारी सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. सकाळी आठ वाजून शेहेचाळीस मिनिटांच्या सुमारास आवाज होऊन जमीन हादरल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. या अनपेक्षित नैसर्गिक संकटामुळे अनेक जण भीतीपोटी घराबाहेर पडले आणि सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर, वारंगा फाटा, औंढा नागनाथ आणि कळमनुरी परिसरात या धक्क्यांची तीव्रता अधिक जाणवली. त्याचप्रमाणे शेजारील नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यांतही भूकंपाचे हादरे बसले. शनिवारी सकाळी आठ वाजून शेहेचाळीस वाजता हा धक्का जाणवला. घरावरील भांडी पडणे, खिडक्यांच्या काचा थरथरणे अशा घटना अनेक गावांत घडल्या. सकाळच्या वेळी जेव्हा अनेक जण कामात व्यस्त होते, तेव्हा अचानक बसलेल्या या धक्क्यामुळे गोंधळ उडाला. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, कुरुंदा आणि आजूबाजूच्या वाड्या-वस्त्यांवरील नागरिक तात्काळ मोकळ्या मैदानात जमा झाले. अनेकांनी भीतीपोटी आपल्या नातेवाईकांना फोन करून विचारपूस करण्यास सुरुवात केली. विशेषतः लहान मुले आणि वृद्ध या घटनेमुळे अधिक भयभीत झाले होते.
हिंगोली जिल्हा आणि परिसरातील भूगर्भीय हालचाली गेल्या काही वर्षांपासून चिंतेचा विषय ठरत आहेत. डिसेंबर २०२५ ला याच भागात तीन पूर्णांक पाच रिश्टर स्केलचा धक्का बसला होता. अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी २५ मार्च रोजी तीन पूर्णांक चार रिश्टर स्केलच्या धक्क्याने हा परिसर हादरला होता. संशोधकांच्या मते, हिंगोली जिल्ह्याचा कळमनुरी आणि वसमत हा भाग भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील होत चालला आहे. भूकंपाचे धक्के बसल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पत्र्याच्या छतावर जड दगड ठेवले जातात. भूकंप झाल्यास हे दगड पडून इजा होण्याची शक्यता असल्याने ते काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समाजमाध्यमांवर पसरणाऱ्या कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाने दिलेल्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पुन्हा धक्का जाणवल्यास घराबाहेर मोकळ्या जागेत जावे आणि विजेच्या खांबांपासून लांब राहावे, अशा सूचना तहसीलदार कार्यालयामार्फत गावागावांत देण्यात येत आहेत.