विदर्भात वाघ – बिबट्यांपासून सतर्कतेचा इशारा देणारी यंत्रणा कार्यान्वित
पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या लगत राहणाऱ्या महाराष्ट्रातील गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी नागपूर ग्रामीण पोलीस आणि वन विभागाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात आता कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ही यंत्रणा वाघ, बिबट्या किंवा अस्वलांसारख्या हिंस्र प्राण्यांचा वावर ओळखताच वन विभाग आणि गावकऱ्यांना त्वरित सतर्कतेचा इशारा देणार आहे.
नागपूर ग्रामीण भागातील पेंच आणि लागून असलेल्या वनक्षेत्रात गेल्या अडीच ते तीन वर्षांत वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यात तब्बल पंधरा गावकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अशा घटनांमुळे अनेकदा गावकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हायचा. यावर कायमस्वरूपी आणि तांत्रिक उपाय शोधण्यासाठी नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि वन विभागाने मार्व्हल या संस्थेच्या मदतीने हा एआय प्रकल्प साकारला आहे. ही एआय यंत्रणा दोन मुख्य तंत्रांवर आधारित आहे, ज्यामुळे प्राण्यांची उपस्थिती अचूकपणे ओळखता येते. जेव्हा जंगलात वाघ किंवा बिबट्या शिकारीसाठी बाहेर पडतो, तेव्हा चितळ, सांबर, माकड आणि मोर विशिष्ट प्रकारचे आवाज काढून इतर प्राण्यांना सतर्क करतात. ही यंत्रणा ते विशिष्ट आवाज टिपते आणि डेटाचे विश्लेषण करून प्राण्याचा वावर असल्याची माहिती त्वरित पाठवते. संवेदनशील ठिकाणी उच्च क्षमतेचे अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये वाघ किंवा बिबट्याचे चित्र कैद होताच, एआय तंत्रज्ञान त्या प्राण्याला ओळखते आणि काही सेकंदातच संबंधित अधिकाऱ्यांच्या व गावकऱ्यांच्या मोबाईलवर इशारा पाठवते.
या यंत्रणेचा परिणाम नुकतेच देवलापार जवळील पिपरिया येथे पाहायला मिळाले. गुरुवारी रात्री या यंत्रणेने परिसरात वाघाचा वावर असल्याचे संकेत दिले. हा सतर्कतेचा इशारा मिळताच गावकरी सावध झाले आणि वन विभागानेही तातडीने हालचाली केल्या. यामुळे संभाव्य जीवघेणा हल्ला टळला. सध्या ही यंत्रणा तीन ठिकाणी प्रत्यक्ष सुरू झाली असून, गेल्या चार दिवसांत दोन वेळा वाघ व बिबट्यांचे अचूक अलर्ट्स देण्यात आले आहेत. प्रादेशिक वन विभागातर्फे विदर्भातील चाळीस संवेदनशील गावांमध्ये ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. या यंत्रणेच्या यशामुळे चंद्रपूरचा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात देखील ही यंत्रणा उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. पेंचसोबतच खापा आणि पारशिवनी परिसरातही ही यंत्रणा प्राधान्याने कार्यान्वित केली जात आहे.