शिर्डीमध्ये लाडू प्रसाद आणि भोजनात महत्त्वाचे बदल
शिर्डीत सध्या गॅस पुरवठ्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा थेट परिणाम श्री साईबाबा संस्थानच्या प्रसादालयावर झाला असून, दररोज लाखो भाविकांना देण्यात येणाऱ्या प्रसादामध्ये प्रशासनाला नाईलाजास्तव मोठे बदल करावे लागले आहेत. शिर्डी संस्थानच्या वतीने चालवल्या प्रसादालयाला भारत पेट्रोलियम आणि इतर कंपन्यांकडून गॅसचा पुरवठा केला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक कारणांमुळे आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे गॅसचा साठा मर्यादित झाला आहे. पाईप नॅचरल गॅस आणि एलपीजी सिलिंडर अशा दोन्ही पातळ्यांवर ही टंचाई भासत असल्याने स्वयंपाकघरातील भट्ट्या चालवणे कठीण झाले आहे.
साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात दररोज हजारो किलो लाडू, डाळ, भात आणि भाज्या तयार केल्या जातात. गॅसची बचत करण्यासाठी संस्थानने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ज्या पदार्थांना जास्त गॅस लागतो किंवा जे पदार्थ तळण्यासाठी अधिक वेळ जातो, त्यांचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. दररोजच्या जेवणात दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या भाज्यांऐवजी आता मर्यादित आणि लवकर शिजणाऱ्या भाज्यांचा समावेश केला गेला आहे. भाविकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या बुंदीच्या लाडूंच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. गॅस अभावी लाडू तयार करण्याची प्रक्रिया मंदावली असून, भाविकांना आता एकच लाडू देण्यात येत आहेत.
शिर्डी संस्थानकडे भव्य सौर ऊर्जा प्रकल्प आहे, ज्याचा वापर पाणी गरम करण्यासाठी आणि वाफेवर अन्न शिजवण्यासाठी केला जातो. मात्र, सध्याचे ढगाळ वातावरण किंवा रात्रीच्या वेळी सौर ऊर्जेवर अवलंबून राहता येत नाही. अशा वेळी गॅस हा एकमेव पर्याय असतो. गॅस नसल्यामुळे सौर यंत्रणेवरचा ताण वाढला असून, ती पूर्ण क्षमतेने अन्न शिजवण्यासाठी पुरेशी ठरत नाहीये. याप्रकरणी गॅस पुरवठादार कंपन्यांशी सतत संपर्क साधला जात असून, आपत्कालीन परिस्थितीत टँकरद्वारे गॅस उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये हा आमचा प्राथमिक उद्देश आहे, मात्र नैसर्गिक आपत्ती किंवा तांत्रिक अडचणींमुळे आम्हाला काही काळ अन्नाच्या पद्धतीत बदल करावा लागत आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
देशभरातून येणाऱ्या भाविकांना जेव्हा प्रसादाच्या लाडूंच्या रांगेत किंवा भोजनालयात बदल जाणवले, तेव्हा काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. शिर्डीत येणारा प्रत्येक भक्त बाबांचा प्रसाद म्हणून लाडू घरी नेतो, मात्र, उत्पादनातील कपातीमुळे अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे किंवा मर्यादित स्वरूपात लाडू दिले जात आहेत. संस्थान आता पर्यायी इंधन व्यवस्था म्हणून डिझेलवर चालणाऱ्या भट्ट्या किंवा अधिक मोठ्या क्षमतेचे गॅस बँक तयार करण्यावर विचार करत आहे. येणाऱ्या सणासुदीच्या काळात आणि सुट्ट्यांमध्ये भाविकांची गर्दी वाढणार आहे, त्यापूर्वी हा प्रश्न मार्गी लावण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.