विदर्भ आणि मराठवाड्यावर अवकाळी पावसाचे सावट – शेतकरी चिंतेत

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालींमुळे राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट उभे राहिले आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवसांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. विशेषतः नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. पूर्व विदर्भात ढगाळ हवामानाचे प्रमाण जास्त असेल. मराठवाड्यातही हवामान बदलले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळू शकतात. विशेषतः दुपारनंतर वातावरणात बदल होऊन ढग दाटून येण्याची शक्यता आहे. यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, अग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचबरोबर अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे वातावरणात आर्द्रता वाढली आहे. या दोन प्रणालींच्या प्रभावामुळे राज्याच्या काही भागात ढगाळ हवामान निर्माण झाले असून, स्थानिक पातळीवर पावसासाठी पोषक स्थिती तयार झाली आहे. हा अवकाळी पाऊस या हंगामात शेतीसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. हरभरा आणि गहू या पिकांसाठी हे धोकादायक आहे. ढगाळ हवामानामुळे आणि पावसामुळे या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. द्राक्ष, डाळिंब आणि संत्रा बागायतदारांसाठी हे हवामान घातक ठरू शकते. पावसामुळे फळांना तडे जाणे किंवा बुरशीजन्य रोगांचा प्रसार होणे असे प्रकार घडू शकतात. विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहेत. पावसामुळे कापसाची प्रत खराब होऊ शकते आणि तुरीच्या फुलोऱ्यावरही याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना काही महत्त्वाचे सल्ले देण्यात आले आहेत. शेतात कापूस किंवा काढणी केलेले धान्य उघड्यावर असेल, तर ते तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावे किंवा झाकून ठेवावे. पाऊस पडण्याची शक्यता असताना कोणतीही फवारणी करू नये. पाऊस थांबल्यानंतर आणि हवामान स्वच्छ झाल्यावरच तज्ज्ञांच्या सल्ल्याने कीडनाशकांचा वापर करावा. शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, विशेषतः फळबागांमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. तर हवामान विभागाने पुढील अठ्ठेचाळीस तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
4,080 वेळा पाहिलं