भारत – बांगलादेश संबंधात नव्या पर्वाची सुरुवात

भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी बांगलादेशचे नवनियुक्त परराष्ट्र मंत्री खलीलुर रहमान यांचे नवी दिल्लीत स्वागत केले. बांगलादेशात सत्तेत आलेल्या नवीन बांगलादेश राष्ट्रवादी पक्षाच्या सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.

डॉ. जयशंकर यांनी खलीलुर रहमान आणि त्यांच्यासोबत आलेल्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासाठी हैदराबाद हाऊस येथे दुपारच्या भोजनाचे आयोजन केले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंधांच्या बळकटीकरणावर चर्चा झाली. गेल्या काही काळातील तणाव विसरून व्यापार, दळणवळण आणि लोकसंपर्क वाढवण्यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला. मध्यपूर्वेतील युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर, बांगलादेशने भारताकडे अतिरिक्त इंधन पुरवठ्याची विनंती केली आहे. १९९६ मध्ये झालेला गंगा जलवाटप करार यावर्षी संपत आहे. त्याच्या नूतनीकरणाबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली. बांगलादेशी नागरिकांसाठी प्रलंबित असलेल्या भारतीय पर्यटन व्हिसा सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत बांगलादेशने आग्रही मागणी केली.

ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना सरकार कोसळल्यानंतर आणि त्यानंतर आलेल्या अंतरिम सरकारमुळे भारत-बांगलादेश संबंधात काहीशी कटुता आली होती. मात्र, फेब्रुवारी २०२६ मध्ये तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर दोन्ही देशांनी संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. डॉ. जयशंकर यांनी या भेटीबाबत सोशल मीडियावर पोस्ट करताना म्हटले की, आम्ही विविध पैलूंवर चर्चा केली असून प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर मते मांडली आहेत. भारत बांगलादेशसोबतचे ऐतिहासिक संबंध पुढे नेण्यास वचनबद्ध आहे. खलीलुर रहमान हे केवळ परराष्ट्र मंत्र्यांनाच भेटले नाहीत, तर त्यांनी भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचीही भेट घेतली. दोन्ही देशांमधील सीमापार व्यापार वाढवणे आणि जमीन बंदरांचे आधुनिकीकरण करणे यावर यावेळी चर्चा झाली. तसेच, त्यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेऊन सीमा सुरक्षा आणि दहशतवादविरोधी सहकार्यावर गुप्त चर्चा केली. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ढाका आता भारतासोबतचे संबंध समानता, परस्पर विश्वास आणि सन्मान या तत्त्वांवर आधारित ठेवण्यास इच्छुक आहे. जुन्या चुका टाळून भविष्यात शाश्वत विकासासाठी एकत्र काम करण्याची तयारी बांगलादेशने दर्शवली आहे. खलीलुर रहमान यांच्यानंतर बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान हेदेखील लवकरच भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.






14,354 वेळा पाहिलं