लक्षणीय लक्षद्वीप
एकूण छत्तीस बेटं मिळून झालेलं, पृथ्वीची एकाहत्तर ते चौऱ्याहत्तर अंश पूर्व रेखांश आणि बारा ते तेरा अंश उत्तर अक्षांश एवढीच टिचकीभर जागा व्यापलेलं, समुद्रसपाटीपासून फक्त शून्य पूर्णांक पाच ते शून्य पूर्णक सात मीटर एवढ्याच उंचावर असलेलं, भारताच्या पश्चिम किनार पट्टीवर केरळच्या कोचीनपासून सुमारे दोनशे चोवीस ते दोनशे चाळीस किलोमीटर अंतरावर एक नखशिखांत स्वर्ग आहे ज्याचं नाव आहे लक्षद्वीप. लाख दिवे जिथे लावले जातात असं म्हटलं जातं ते लक्षद्वीप जेमतेम सत्तर हजार लोकवस्तीला गुण्यागोविंदाने नांदवत आहे. नारळ, लिंबू, चिंच, केळी यांच्या बागा अंगाखांद्यावर बाळगत आहे. लक्षद्वीप ही भारत उपखंडातील कोरल बेटांची एकमेव मालिका आहे. निसर्ग सौंदर्यातच नाही तर ब्याण्णव पूर्णांक अठ्ठावीस टक्के साक्षरता असलेलं लक्षद्वीप हे देशातील केरळ नंतरच दुसरं साक्षर राज्य आहे.
लक्षद्वीप हे भारतातील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी सर्वात लहान केंद्रशासित राज्य आहे. याचे क्षेत्रफळ बत्तीस चौ. किमी. आहे. केरळ जवळ असल्यामुळे मल्याळम ही इथली प्रमुख भाषा आहे. कवरत्ती हे बेट ही लक्षद्वीपची राजधानी आणि सर्वात मोठं शहर आहे. इथून जवळच असलेलं मिनीकॅाय बेट अतुलनीय निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. फॅास्फेट, कॅल्शीयम, कार्बोनेट ह्या खनिजांचं हे माहेरघर आहे.
ह्या कोरल बेटांच्या समूहाला एक लक्षणीय इतिहास ही आहे. काही अरब व्यापाऱ्यांच्या हुकुमावरून जेव्हा राजा चेरमान पेरुमाल यास इस्लाम धर्म स्वीकारण्यास जबरदस्ती करण्यात आली तेव्हा राजधानी क्रंगनोर (कोडुंगलूर) मधून तो मक्केला जाण्याच्या निमित्ताने पळून गेला. त्याला शोधण्यासाठी अनेक ठिकाणांवरून मक्केकडे जाणाऱ्या खलाशी बोटी सोडण्यात आल्या. त्या खलाशांनी विश्रामासाठी जागा शोधता शोधता एकेक बेट शोधून काढलं असं सांगतात. आज मुस्लिम आणि हिंदू धर्मीय इथे गुण्यागोविंदाने नांदत आहेत.
पोर्तुगीज भारतात सोळाव्या शतकात आले त्यावेळी समुद्रपर्यटकांच्या दृष्टीनं लक्षद्वीपला विशेष महत्त्व आलं. जहाजांसाठी नारळाच्या काथ्याचे दोरखंड मिळव्यासाठी ते अमिनी बेटांवरील जहाजांची लूट करीत. परंतु बेटावरील लोकांनी या अतिक्रमण करणाऱ्या लोकांना विष घालून मारलं आणि या अतिक्रमणाचा शेवट झाला.
सोळाव्या शतकात आधी चिरक्कलच्या राजाकडे असलेली बेटे मग कननोरच्या अरक्कल या मुस्लिम राजाकडे आणि मग अमिनी गटातील बेटांची सत्ता टिपू सुलतानकडे देण्यात आली. १७९९ मध्ये श्रीरंगपट्टणच्या युद्धात टिपू सुलतान मारला गेल्यानंतर बेटांचा ताबा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे आला. १८४७ मध्ये एका तीव्र चक्रीवादळात नुकसान झाल्यावर चिरक्कलच्या राजाने ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी सर विल्यम रॉबिन्सन याच्याकडून दोन लाख रुपयांची मदत मागितली पण ती परत करू न शकल्यामुळे १८५४ मध्ये उरलेल्या सर्व बेटांचे प्रशासन ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात देण्यात आलं. दोन लाख रुपयांच्या मोबदल्यात ही बेटं घेतली म्हणून त्यांचे नाव ‘लक्षद्वीप’ पडलं असं म्हटलं जातं.
देशातील या सर्वात लहान केंद्रशासित प्रदेशाचा भूभाग कमी असला, तरी याला चार हजार दोनशे चौ. कि.मी.चे खाजणक्षेत्र, वीस हजार चौ. कि.मी.चे जलक्षेत्र लाभलेले आहे. या बेटांवरील वार्षिक सरासरी पर्जन्यमान एकशेसाठ सेंमी. असून दोन्हीही मॉन्सूनचा पाऊस येथे पडतो. मार्च, एप्रिल व मे महिन्यांत कडक उन्हाळा जाणवतो. नारळ, केळी, अळू, शेवगा, विलायती फणस, फणस व रानटी बदाम ह्या वनस्पती या प्रदेशात आढळतात. भूभागावर गुरेढोरे व पाळीव पक्षी आढळतात. पक्षी अभयारण्य म्हणूनच हे बेट घोषित करण्यात आलं आहे.
कवरत्ती ही लक्षद्वीपची राजधानी असून येथे सर्व शासकीय कार्यालये आहेत. याच बेटावर मत्स्यालय व जलजीवालय आहे. स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय व्यवसायाच्या विकासास लक्षद्वीपमध्ये खूप वाव आहे; परंतु भारताच्या मुख्य भूमीवरून लक्षद्वीपला जाण्यासाठी पूर्वी असलेल्या कडक निर्बंधांमुळे पर्यटन व्यवसायाचा विशेष विकास झालेला नव्हता तथापि वरील निर्बंध थोड्या प्रमाणात सौम्य करण्यात आल्यामुळे लक्षद्वीपला जाणाऱ्या स्थानिक आणि परदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्यास चालना मिळालेली आहे. खारकच्छच्या उथळ व नितळ पाण्यात वाढणारे प्रवाळ हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते. अगत्ती बेटावर धावपट्टी तयार करण्यात आली असून एप्रिल 1988 पासून मुख्य भूमी व अगत्ती यादरम्यान विमान सेवा कार्यान्वित झाली आहे. बंगारम बेटावर मनुष्यवस्ती नसली, तरी तेथे वेगवेगळ्या सुविधा पुरवून पर्यटन केंद्र म्हणून त्याचा विकास करण्यात आला आहे. असं लक्षद्वीप एक लक्षणीय प्रेक्षणीय स्थळ आहे.