
अवकाशातून पृथ्वीवर कधीही संकट ओढवू शकते, असा धोक्याचा इशारा अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने दिला आहे. अंतराळात हजारो असे लघुग्रह लपलेले आहेत, ज्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. हे लघुग्रह कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय पृथ्वीवर धडकू शकतात आणि एखादे शहर एका झटक्यात नष्ट करण्याची क्षमता ठेवतात, असे धक्कादायक वास्तव नासाने समोर आणले आहे.
नासाच्या व्याख्येनुसार, ज्या लघुग्रहांचा आकार साधारणपणे एकशे चाळीस मीटरपेक्षा जास्त असतो, त्यांना धोकादायक श्रेणीत ठेवले जाते. जर असा एखादा लघुग्रह पृथ्वीच्या वातावरणात शिरून जमिनीवर आदळला, तर तो हायड्रोजन बॉम्बपेक्षाही भीषण ऊर्जा उत्सर्जित करतो. यामुळे शेकडो किलोमीटरचा परिसर बेचिराख होऊ शकतो. सध्याच्या तंत्रज्ञानानुसार आपण एक किमी पेक्षा जास्त लघुग्रहांवर लक्ष ठेवू शकतो, मात्र मध्यम आकाराचे हे धोकायादयक लघुग्रह अनेकदा सूर्याच्या प्रकाशामुळे किंवा अंधारामुळे दुर्बिणीच्या नजरेतून सुटतात.
नासाने दिलेल्या माहितीनुसार, शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार पृथ्वीच्या जवळून जाणाऱ्या अशा सुमारे पंचवीस हजार धोकादायक लघुग्रहांपैकी केवळ चाळीस टक्के लघुग्रहांचा शोध आतापर्यंत लागला आहे. उर्वरित सुमारे पंधरा हजार लघुग्रह अद्याप शोधले गेलेले नाहीत. ते नेमके कुठे आहेत आणि त्यांचा प्रवास कोणत्या दिशेने सुरू आहे, याची कोणतीही माहिती आपल्याकडे नाही. जर यापैकी एखादा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने झेपावला, तर आपल्याला पूर्वतयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. हे लघुग्रह शोधण्यात अडथळा म्हणजे सूर्य हा आहे. अनेक लघुग्रह सूर्याच्या दिशेने पृथ्वीकडे येतात, त्यामुळे सूर्याच्या तीव्र प्रकाशामुळे आपल्या जमिनीवरील दुर्बिणींना ते दिसत नाहीत. २०१३ मध्ये रशियाच्या चेल्याबिन्स्क शहरावर झालेला उल्कापात याचे जिवंत उदाहरण आहे. त्यावेळेस कोणतीही पूर्वसूचना न मिळता तो छोटा लघुग्रह आदळला होता, ज्याने दीड हजारांहून अधिक लोक जखमी झाले होते. या छुप्या संकटाचा सामना करण्यासाठी नासा आता नीओ सर्व्हेयर नावाच्या नवीन अंतराळ दुर्बिणीवर काम करत आहे. ही दुर्बीण इन्फ्रारेड किरणांच्या सहाय्याने अंतराळातील उष्णता शोधून काढेल, ज्यामुळे अंधारात लपलेले काळे लघुग्रहही स्पष्ट दिसू शकतील. पुढील दहा वर्षांत नव्वद टक्के धोकादायक लघुग्रहांची ओळख पटवणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. पृथ्वीला वाचवण्यासाठी नासाने यापूर्वी डार्ट मोहिमेद्वारे एका लघुग्रहाची दिशा बदलण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. मात्र, दिशा बदलण्यासाठी तो लघुग्रह वेळेत शोधणे सर्वात महत्त्वाचे असते.