ही दोस्ती तुटायची नाय – लग्नानंतरची मैत्री

नात्यामध्ये जेव्हा संवादाची जागा दीर्घ मौन घेते तेव्हा पंचवीस वर्षांचे समृद्ध सहजीवनही एका अनपेक्षित वळणावर येऊन थबकते. ‘अष्टविनायक’ आणि ‘नाट्यलीला थिएटर्स’ निर्मित ‘ही दोस्ती तुटायची नाय’ हे नाटक अशाच एका मध्यमवयीन जोडप्याची गोष्ट सांगते जे आपल्या लग्नाचा रौप्य महोत्सव साजरा केल्यानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात. लेखकाने या गंभीर विषयाला विनोदाची आणि भावूक क्षणांची अशी काही जोड दिली आहे की प्रेक्षक नाटकात पूर्णपणे गुंतून जातात.

नाटकाची सुरुवात होते ती एका विस्कटलेल्या संसाराच्या चित्राने. ज्या जोडप्याने २५ वर्षे एकत्र काढली ज्यांनी एकमेकांचे सुख-दुःख जवळून पाहिले ते आज न्यायालयाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. मात्र, कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून त्यांना एका समुपदेशक दाम्पत्याला भेटणे अनिवार्य असते. या भेटीदरम्यान त्यांच्या नात्यातील अनेक थर हळूहळू उलगडत जातात. जुन्या आठवणी एकमेकांबद्दलच्या लहान-मोठ्या तक्रारी, हरवलेले प्रेम आणि मनाच्या कोपऱ्यात दडून राहिलेले हळवे भाव अतिशय प्रभावीपणे समोर येतात. लेखकाने या संवादांमधून हे सिद्ध केले आहे की घटस्फोटामागे नेहमीच एखादं मोठं कारण असतं असं नाही तर कधीकधी छोट्या गोष्टींकडे झालेलं दुर्लक्षही नातं संपवायला कारणीभूत ठरतं.

या नाटकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सुमीत राघवन आणि चिन्मयी सुमीत यांची जुगलबंदी. या दोन कसलेल्या कलाकारांनी आपल्या नैसर्गिक अभिनयाने पात्रांमध्ये जिवंतपणा आणला आहे. पती-पत्नीमधील तणाव आणि तरीही एकमेकांबद्दल वाटणारी ओढ त्यांनी आपल्या डोळ्यांतून आणि देहबोलीतून समर्थपणे व्यक्त केली आहे. सुमीत राघवन यांचा कॉमिक टायमिंग आणि चिन्मयी सुमीत यांचा शांत पण प्रभावी वावर नाटकाची उंची वाढवतो. तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारे अमृता बने आणि शुभंकर एकबोटे यांनी समुपदेशक दाम्पत्याची भूमिका चोख बजावली आहे. दोन पिढ्यांमधील विचारांची ही देवाणघेवाण नाटकाला अधिक प्रगल्भ बनवते. दिग्दर्शक सूरज पारसनीस यांनी नाटकाचा वेग आणि भावूक क्षण यांचा उत्तम समतोल साधला आहे.

नाटक केवळ एका जोडप्याच्या भांडणाची कथा नसून ते आजच्या काळात हरवत चाललेल्या सुसंवादावर भाष्य करते. पती-पत्नीमधील नातं केवळ कर्तव्यापुरतं किंवा मुलांच्या जबाबदारीपुरतं मर्यादित न राहता त्यात ‘मैत्री’ असणं किती गरजेचं आहे. हे यातून प्रकर्षाने जाणवते. जेव्हा दोन व्यक्तींमधील मैत्री संपते तेव्हाच नात्यात दुरावा निर्माण होतो. हे नाटक सांगते की पन्नाशी ओलांडली असली तरी नात्यात नवीनपणा आणि उबदारपणा टिकवून ठेवणे शक्य आहे. गरज आहे ती फक्त एकमेकांना पुन्हा एकदा समजून घेण्याची.

‘ही दोस्ती तुटायची नाय’ हे नाटक हसवता हसवता डोळ्यांच्या कडा ओलावते आणि प्रेक्षागृहातून बाहेर पडताना विचार करायला लावते. ओंकार गोखले यांचे खुसखुशीत संवाद आणि सूरज पारसनीस यांचे दिग्दर्शन यामुळे हे नाटक मराठी रंगभूमीवर एक वेगळा ठसा उमटवण्यात यशस्वी झाले आहे. ज्यांना आपल्या नात्यातील हरवलेली मैत्री पुन्हा शोधायची आहे आणि ज्यांना दर्जेदार अभिनयाचा अनुभव घ्यायचा आहे. अशा सर्व वयोगटातील प्रेक्षकांनी हे नाटक आवर्जून पाहावे. हे नाटक आपल्याला पुन्हा एकदा प्रेमात पडायला आणि नाती जपायला शिकवते.






11,664 वेळा पाहिलं