
मराठी मनोरंजन विश्वात आपल्या वेगळ्या विषयांच्या मालिकांनी प्रेक्षकांची मने जिंकणारी वाहिनी म्हणजे ‘स्टार प्रवाह’. आता याच वाहिनीवर एक अत्यंत संवेदनशील आणि मनाला स्पर्श करणारी नवीन मालिका ‘आनंदी’ ३० मार्च २०२६ पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या पहिल्या प्रोमोला अवघ्या काही तासांत २ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले असून प्रेक्षकांमध्ये या मालिकेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
या मालिकेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील दोन दिग्गज अभिनेते अरुण नलावडे आणि समीर धर्माधिकारी यांचे मालिका विश्वात होणारे पुनरागमन. ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे जवळपास तीन वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतत आहेत. ते या मालिकेत आनंदीच्या आजोबांची म्हणजेच ‘आत्माराम जाधव’ म्हणजे आबा यांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. तर ७ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर लोकप्रिय अभिनेते समीर धर्माधिकारी एका कणखर भूमिकेत दिसणार आहेत. ते प्रसिद्ध उद्योगपती ‘युगंधर निंबाळकर’ ही व्यक्तिरेखा साकारणार असून ही स्टार प्रवाहसोबतची त्यांची पहिलीच मालिका आहे.
‘आनंदी’ या मालिकेची गोष्ट इचलकरंजीमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती फिरते. आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या तीन नातींची जबाबदारी आत्माराम जाधवयांच्या खांद्यावर आहे. यातील मुख्य पात्र ‘आनंदी’ला दृष्टी नसली तरी तिच्या आजोबांनी तिला जगण्याचा एक वेगळा आणि सकारात्मक दृष्टिकोन दिला आहे. “रंग फक्त डोळ्यांनीच दिसतात की ते मनानेही अनुभवता येतात?” या संकल्पनेवर ही मालिका आधारलेली आहे. आनंदीचे जगणे आणि तिच्या आयुष्यातील संघर्ष, प्रेम आणि जिद्द यांचे दर्शन या मालिकेतून घडणार आहे.
समीर धर्माधिकारी यांनी साकारलेला ‘युगंधर’ हा एक शिस्तप्रिय उद्योगपती आहे. ज्याच्यासाठी त्याचे कामच त्याचा धर्म आहे. त्याने गावातील अनेकांना रोजगार देऊन त्यांचे संसार सावरले आहेत त्यामुळे गावात त्याला देवासारखे मानले जाते. दुसरीकडे अरुण नलावडे यांनी साकारलेले ‘आबा’ हे आपल्या नातींसाठी रात्रंदिवस कष्ट करणारे एक प्रेमळ आजोबा आहेत. आपल्या नातींनी शिकावे, स्वावलंबी व्हावे आणि सुखी व्हावे, हेच त्यांचे एकमेव स्वप्न आहे.
जागतिक रंग दिनाच्या निमित्ताने ‘आनंदी’ मालिकेच्या टीमने एका सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवला. त्यांनी दृष्टीहीन मुलांसोबत वेळ घालवून “रंग स्पर्शाने आणि मनाने कसे अनुभवायचे” याचा सुंदर संदेश दिला. केवळ दिसणाऱ्या छटा म्हणजे रंग नसून, भावनांमध्ये दडलेले रंग अधिक समृद्ध असतात हेच या मालिकेचे सार आहे.उत्तम कलाकार, दर्जेदार निर्मिती आणि एक वेगळा विषय घेऊन येणारी ‘आनंदी’ ही मालिका कौटुंबिक नातेसंबंधांची वीण अधिक घट्ट करणारी ठरेल.