दक्षिण कॅलिफोर्नियात विषारी वायू गळती

अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्निया प्रदेशात एका धोकादायक रासायनिक गळतीमुळे मोठी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. सुमारे चाळीस हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. ऑरेंज काउंटीमधील गार्डन ग्रोव्ह शहरातील एका अंतराळ व विमान उद्योगाशी संबंधित कारखान्यातील रासायनिक साठवण टाकीमधून विषारी वायू बाहेर पडू लागल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संभाव्य स्फोटाचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीची कारवाई केली.

गार्डन ग्रोव्ह येथील ‘जीकेएन एअरोस्पेस’ या कंपनीच्या प्रकल्पात ‘मिथाइल मेथाक्रिलेट’ नावाचे अत्यंत ज्वलनशील रसायन साठवून ठेवण्यात आले होते. ही टाकी अतिउष्ण झाल्यानंतर त्यातून विषारी वाफ बाहेर पडू आली. ऑरेंज काउंटी अग्निशमन विभागाचे अधिकारी क्रेग कोवे यांनी सांगितले की, टाकी कधीही फुटू शकते किंवा तिला भेगा पडून मोठ्या प्रमाणात रसायन बाहेर सांडू शकते. प्रशासनाने परिस्थिती गंभीर असल्याचे स्पष्ट करत नागरिकांना तातडीने परिसर रिकामा करण्याचे आवाहन केले.

या धोक्यामुळे गार्डन ग्रोव्हसह सायप्रेस, स्टॅन्टन, अ‍ॅनाहाइम, बुएना पार्क आणि वेस्टमिन्स्टर या शहरांमधील काही भागांत स्थलांतर आदेश लागू करण्यात आले. अनेक शाळा बंद ठेवण्यात आल्या असून, रस्त्यांवर वाहतूकही रोखण्यात आली आहे. अग्निशमन दलाने टाकी थंड ठेवण्यासाठी पाण्याचा सतत मारा सुरू केला आहे. तसेच रसायन बाहेर सांडल्यास ते नाल्यांमध्ये किंवा समुद्रात जाऊ नये यासाठी वाळूच्या पोत्यांचे अडथळे उभारण्यात आले आहेत.

आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे रसायन तापल्यास बाहेर पडणारी वाफ मानवी आरोग्यास अत्यंत घातक ठरू शकते. त्यामुळे श्वसनाचे त्रास, डोळ्यांत जळजळ, त्वचेची खाज, मळमळ आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नसली तरी प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. गार्डन ग्रोव्हच्या महापौर स्टेफनी क्लॉपफेनस्टाइन यांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड चिंता पसरली आहे. डॅनी फाम नावाच्या रहिवाशाने सांगितले की, सकाळी अचानक घर सोडावे लागल्याने तो घाबरून गेला. अनेक नागरिकांनी फक्त आवश्यक कागदपत्रे आणि औषधे घेऊन सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. प्रशासनाने तात्पुरती निवारा केंद्रे उभारली असून, तज्ज्ञ पथके परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लॉस एंजेलिसच्या दक्षिणेला असलेल्या या भागात सुरू असलेल्या या संकटामुळे संपूर्ण कॅलिफोर्नियात चिंता व्यक्त केली जात आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
19,093 वेळा पाहिलं