वांद्रे किल्ला

मुंबईत असलेला वांद्रे किल्ला प्रसिद्ध आहे. सागरकिनारी असल्याने हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटक येथे आवर्जून जातात. या किल्ल्याचे जतन केले असल्याने तो सुस्थितीत आहे. म्हणजे काही गोष्टी अवशेषरुपात आहेत; पण ज्या चांगल्या आहेत, त्यांचे संवर्धन केल्या गेले आहे. वांद्रे येथील ‘सी रॉक’ हॉटेलला लागून दक्षिणेकडे गेलेला रस्ता थेट वांद्रे किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जातो. येथे जाण्यासाठी वांद्रे रेल्वे स्थानकावरुन बससेवाही आहे.

वांद्रे म्हणजे ‘साष्टी’ बेटाचे दक्षिणेकडील टोक. इसवी सन 16 व्या शतकाच्या पूर्वार्धात सध्याच्या महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीचा प्रदेश पोर्तुगीजांना गुजरातच्या सुलतानाकडून मिळाला. सन 1661 साली पोर्तुगालने मुंबई बेट ब्रिटीशांना आंदण म्हणून दिले.

आज दिसणारा हा किल्ला रुढार्थाने किल्ला म्हणता येईल असा नाही; मात्र पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये त्याचा किल्ला असा उल्लेख आहे. समुद्रकिनाऱ्यावर हा किल्ला आहे. हा समुद्रकिनारा बऱ्यापैकी खडकाळ असून त्यालगतच्या एका टेकडीवर हा किल्ला बांधण्यात आला. या किल्ल्याच्या मुख्य दरवाजातून आत गेल्यानंतर डाव्या हातास एका कौलांचे छप्पर असलेल्या खोलीचे अवशेष दिसतात. खोलीच्या आत दरवाज्यालगतच्या डाव्या भिंतीत एक कोनाडा होता. हा कोनाडा आजही भिंतीच्या अवशेषांमध्ये टिकून आहे.

वांद्रे किल्ल्याचे दरवाजेही मुंबईत आढळणाऱ्या युरोपीय लोकांनी बांधलेल्या इतर ‍किल्ल्यांपेक्षा खूपच वेगळे आहेत. किल्ल्याच्या भिंतीही मुंबईतील अन्य युरोपीय किल्ल्यांपेक्षा निराळ्या आहेत. या भिंती सरळ उभ्या असून त्यांची जाडी मुंबईतील अन्य किल्ल्यांच्या भिंतींच्या जाडीपेक्षा कमी आहे. तटबंदीतील तोफांच्या खाचा आज तरी दिसत नाहीत.
या किल्ल्याची दुरुस्ती व सुशोभिकरणाची कामे पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने केली आहेत. त्यामुळे हा किल्ला आजही चांगल्या स्थितीत आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
747 वेळा पाहिलं