महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची बैठकीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी एकमताने निवड करण्यात येईल. यासाठी सुनेत्रा पवार या मुंबईत दाखल झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयाला आपला पाठिंबा दर्शवला असून, आज सायंकाळी पाच वाजता राजभवनावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.
सुनेत्रा पवार यांनी आतापर्यंत प्रामुख्याने बारामती मतदारसंघाच्या विकासात आणि अजित पवारांच्या निवडणूक व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्या सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत. त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभवाची कमतरता असली, तरी काटेवाडी आणि बारामतीमधील त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांना जनमानसात मोठी मान्यता आहे. सुनेत्रा पवार या सध्या राज्य विधीमंडळाच्या सदस्य नाहीत. त्यामुळे शपथ घेतल्यानंतर पुढील सहा महिन्यांच्या आत त्यांना कोणत्याही एका सभागृहावर निवडून येणे बंधनकारक असेल. अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातून त्या पोटनिवडणूक लढवू शकतात. त्यांच्या राज्यसभेतील रिक्त खासदार पदासाठी त्यांचा मुलगा पार्थ पवारा यांच्या नावाची चर्चा सध्या सुरु आहे.
पाच फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला सक्षम नेतृत्वाची गरज होती. याच निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीत येत होते. सुनेत्रा पवार यांचे नेतृत्त्व या निवडणुकांसाठी मिळेल. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदासोबतच राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा ही खाती दिली जाण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्याकडे असलेले अर्थमंत्रालय सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवू शकतात, जेणेकरून आगामी अर्थसंकल्पाचे नियोजन विनाव्यत्यय पार पडेल.