नागपूरला जागतिक स्तरावर संरक्षण उत्पादनाचे केंद्र बनवणार

भारताला संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी नागपूरमध्ये एक मोठे पाऊल पडले आहे. सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस तर्फे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक रोबोटिक्स ॲण्ड युएव्ही फॅसिलिटी प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. या प्रकल्पामुळे नागपूरची ओळख आता जागतिक स्तरावर संरक्षण उत्पादनाचे केंद्र म्हणून होईल, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.

सध्याच्या काळात केवळ शस्त्रेच नव्हे तर व्यापाराचाही शस्त्र म्हणून वापर केला जात आहे. ज्या देशाकडे अत्याधुनिक सामरिक शक्ती आणि प्रगत तंत्रज्ञान आहे, तोच देश भविष्यात जगाचे नेतृत्व करेल. सोलर समूहाने देशाच्या संरक्षण क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे, असे भूमीपूजन समारंभाला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्य सरकारने संरक्षण तंत्रज्ञान, एरोस्पेस आणि डीपटेक क्षेत्रासाठी विशेष धोरण तयार केले आहे. या धोरणांतर्गत झालेली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. अत्याधुनिक ड्रोन असो वा पिनाका रॉकेट, सोलर समूहाने मेक इन इंडियाच्या माध्यमातून भारताची ताकद वाढवली आहे. राष्ट्रप्रथम या विचारातून काम करणाऱ्या या समूहाला राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी तंत्रज्ञानातील बदलांवर प्रकाश टाकला. सध्या जगभरात सुरू असलेल्या युद्धांमधून रोबोटिक्स आणि ड्रोनचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. आम्ही आमची संरक्षण सज्जता वाढवत आहोत, ती कुणावर आक्रमण करण्यासाठी नसून विश्वशांतीसाठी आहे. सोलरचा हा नवीन प्रकल्प भविष्यातील तंत्रज्ञानावर आधारित आहे, असे त्यांनी नमूद केले. खासगी क्षेत्रातील क्षमता ओळखून सरकार अशा प्रकल्पांना सातत्याने प्रोत्साहन देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडच्या या नवीन युनिटमध्ये अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. येथे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मध्यम उंचीवर आणि लांब पल्ल्याचे उड्डाण करणारे ड्रोन, लष्करी रोबोट्स आणि विविध संरक्षण उपकरणांची निर्मिती होईल. हा प्रकल्प पूर्णपणे स्वदेशी उत्पादनावर भर देणारा असून, यामुळे ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला मोठी बळकटी मिळेल. या प्रकल्पामुळे नागपूर आणि विदर्भातील हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या सोहळ्याला वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार चरणसिंग ठाकूर, सोलर समूहाचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, व्यवस्थापकीय संचालक मनीष नुवाल, राघव नुवाल, हर्ष नुवाल यांच्यासह संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि उद्योग प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्यनारायण नुवाल यांनी समूहाच्या भविष्यातील ध्येय-धोरणांविषयी माहिती दिली, तर राघव नुवाल यांनी उपस्थितांचे आभार मानले.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
14,834 वेळा पाहिलं