मुंबई अग्निशमन दलाची क्षमता वाढणार – एकशे चार मीटरपेक्षाही उंच शिडी घेणार
मुंबई शहरात आता अग्निशमन दलाची ताकद वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वाढत्या उंच इमारतींच्या पार्श्वभूमीवर, अग्निशमन दलासाठी सध्याच्या शिडीपेक्षाही अधिक उंचीची, म्हणजे एकशे चार मीटर किंवा त्यापेक्षाही अधिक प्रगत शिडी खरेदी करण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत केली.
मुंबईतील वाढत्या इमारतींच्या उंचीवर नियंत्रण मिळवण्यावरून विधान परिषदेचे भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारचे लक्ष वेधले होते. चौतीस मजल्यांपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींना परवानगी देताना, तिथे आग विझवण्यासाठी लागणारी पुरेशी यंत्रणा आपल्या अग्निशमन दलाकडे उपलब्ध आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. सध्याच्या अग्निशमन दलाच्या मर्यादित क्षमतेमुळे शंभर ते एकशे पंचवीस मजली इमारतींच्या प्रस्तावांना मंजुरी देणे कितपत योग्य आहे, अशी चर्चा त्यांनी अर्ध्या तासाच्या चर्चेद्वारे सभागृहात मांडली. या चर्चेला उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले की, मुंबईतील वाढत्या गगनचुंबी इमारतींच्या गरजेनुसार अग्निशमन यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यांनी सांगितले की, सध्या मुंबई अग्निशमन दलाकडे चौऱ्याण्णव मीटर उंचीपर्यंत पोहोचणारी शिडी उपलब्ध आहे. मात्र, जागतिक दर्जाच्या मुंबई शहराची वाढती व्याप्ती पाहता, आणखी प्रगत यंत्रणेची आवश्यकता आहे. सध्या देशात चेन्नईच्या अग्निशमन दलाकडे एकशे चार मीटरची सर्वात उंच शिडी उपलब्ध आहे. मुंबईसाठी त्यापेक्षाही अधिक अत्याधुनिक तंत्रज्ञानाची शिडी उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेला योग्य ते निर्देश देण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
उंच इमारतींना परवानगी देताना अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. इमारतींमध्ये अग्निरोधक पायऱ्या, विशेष अग्निरोधक लिफ्ट, जलतुषार प्रणाली, आपत्कालीन मार्ग आणि प्रगत अलार्म यंत्रणा असणे आवश्यक आहे. या सर्व सुरक्षाविषयक अटी पूर्ण केल्यानंतरच महानगरपालिका आणि अग्निशमन विभागाकडून इमारतीला अंतिम भोगवटा प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.