राज्यात वादळी पावसाचे सावट – शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा
महाराष्ट्रात पुढील चार दिवस विविध भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज असून, यावेळी सोसाट्याचे वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक आणि विशेषतः शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक ठिकाणी विजांचा लखलखाट, ढगांचा गडगडाट आणि वेगवान वाऱ्यासह पावसाची हजेरी लागेल. या काळात वाऱ्याचा वेग साधारण तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास इतका राहू शकतो, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अचानक येणाऱ्या या संकटामुळे जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने सतर्क राहणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या समाज मध्यमावरून वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता नमूद केली. आहे. त्यांनी म्हटले आहे की, राज्यातील काही भागांमध्ये 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत. हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवून शेतीची कामे नियोजित करावीत आणि संभाव्य पाऊस व वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक राहू शकतो. त्याचप्रमाणे विदर्भातील नागपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या परिसरातही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. राज्याच्या या पूर्व आणि मध्य भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळेल, असे संकेत हवामान अभ्यासकांनी दिले आहेत.
वातावरणातील या बदलामुळे शेतीमालाचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीस आलेली पिके सुरक्षित स्थळी हलवावीत आणि शेतीकामांचे नियोजन हवामान पाहूनच करावे, असा सल्ला देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यामुळे पिकांचे आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने कराव्यात, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जाणवणारी उष्णतेची लाट आता ओसरत असून संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. यामुळे येणाऱ्या काही दिवसांत तापमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळतील, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.