
इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो हाणून पाडण्यासाठी अमेरिका आणि तिचे मित्रराष्ट्र सज्ज असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही लवकरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली, सुरक्षित आणि मुक्त करू, असे आश्वासन ट्रम्प यांनी दिले असून, यासाठी अनेक देशांना आपल्या युद्धनौका पाठवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात भीषण संघर्ष सुरू आहे. इस्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणमधील विविध लक्ष्यांवर जोरदार हल्ले केले आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली. ही सामुद्रधुनी बंद झाल्यामुळेर जगाचा तेल पुरवठा विस्कळीत झाला असून जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत आहे.
यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी लिहिले आहे की, इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे ज्या देशांचे नुकसान होत आहे, ते सर्व देश अमेरिकेच्या सोबतीने आपल्या युद्धनौका तिथे पाठवतील. आम्ही यापूर्वीच इराणच्या नौदलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. आता ही सामुद्रधुनी पूर्णपणे सुरक्षित आणि मुक्त केली जाईल. यावेळी ट्रम्प यांनी केवळ अमेरिकेच्या कारवाईवर भर न देता, इतर देशांच्या सहभागावरही जोर दिला आहे. विशेषतः आशियाई आणि युरोपीय देश जे आपल्या ऊर्जा गरजांसाठी या मार्गावर अवलंबून आहेत, त्यांनीही या मोहिमेत सहभागी व्हावे, असे ट्रम्प यांचे संकेत आहेत. सामुद्रधुनी सुरक्षित ठेवणे ही केवळ अमेरिकेची जबाबदारी नसून ती जागतिक व्यापार सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग आहे. ओमान आणि इराणच्या दरम्यान असलेला हा अरुंद समुद्रमार्ग इराणच्या आखाताला ओमानच्या आखाताशी आणि अरबी समुद्राशी जोडतो. जगातील एकूण तेल व्यापारापैकी सुमारे वीस ते पंचवीस टक्के व्यापार याच मार्गावरून होतो. सौदी अरेबिया, कुवेत, इराक आणि संयुक्त अरब अमिराती यांसारखे मोठे तेल उत्पादक देश याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळेच, इराणने हा मार्ग रोखणे म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेची नाडी रोखण्यासारखे आहे. अमेरिकेने दावा केला आहे की, त्यांनी केलेल्या अलीकडील लष्करी कारवायांमध्ये इराणच्या नौदलाची मोठी हानी झाली आहे. इराणचे हल्ले परतवून लावण्यासाठी आणि त्यांच्या नौदलाची ताकद कमी करण्यासाठी अमेरिकन बनावटीची अत्याधुनिक शस्त्रे आणि इस्रायलची लष्करी रणनीती काम करत आहे. ट्रम्प यांच्या विधानावरून हे स्पष्ट होते की, अमेरिका आता केवळ संरक्षणात्मक पवित्रा न घेता आक्रमकपणे हा मार्ग मोकळा करण्यासाठी पावले उचलत आहे.