मुंबई विद्यापीठात चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम – पर्याय निवडीचे स्वातंत्र्य
मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून अनेक स्वायत्त आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम लागू केला आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना आता ऑनर्स आणि संशोधन असे दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांकडे आता पदवी पूर्ण करण्यासाठी दोन मुख्य पर्याय असतील. एखाद्या विद्यार्थ्याला फक्त पदवी हवी असेल, तर तो तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी मिळवू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान हवे आहे, ते चौथ्या वर्षासाठी प्रवेश घेऊ शकतात. चार वर्षे पूर्ण केल्यावर त्यांना पदवी – ऑनर्स प्रदान केली जाईल. ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात पीएचडी करायची आहे, त्यांच्यासाठी चौथ्या वर्षात संशोधन हा पर्याय असेल. मात्र, यासाठी विद्यापीठाने कडक अट घातली आहे. पहिल्या सहा सत्रांमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा श्रेणी सात पूर्णांक पाच किंवा त्यापेक्षा जास्त असेल, त्यांनाच चौथ्या वर्षात संशोधन हा विषय घेता येईल. या विद्यार्थ्यांना चौथ्या वर्षी एका संशोधन प्रकल्पावर काम करावे लागेल. ज्या विद्यार्थ्यांचा श्रेणी सात पूर्णांक पाच पेक्षा कमी आहे. मात्र, त्यांना चार वर्षांचे शिक्षण पूर्ण करायचे आहे, ते ऑनर्स पदवी घेऊ शकतात. यामध्ये त्यांना संशोधनाऐवजी त्या विषयातील अतिरिक्त प्रगत विषयांचा अभ्यास करावा लागेल. यासोबतच मुंबई विद्यापीठाने क्रेडिट पद्धत अधिक लवचिक केली आहे. एक वर्ष पूर्ण करून सोडल्यास प्रमाणपत्र मिळेल. दोन वर्षे पूर्ण केल्यास पदविका मिळेल. तीन वर्षांनंतर पदवी मिळेल. चार वर्षांनंतर ऑनर्स किंवा संशोधन सह पदवी मिळेल.
चार वर्षांची पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठा फायदा म्हणजे, त्यांना पदव्युत्तर शिक्षण केवळ एका वर्षात पूर्ण करता येईल. याउलट, तीन वर्षांची पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मास्टर डिग्रीसाठी दोन वर्षे द्यावी लागतील. विद्यापीठाने सर्व संलग्न महाविद्यालयांना आदेश दिले आहेत की, त्यांनी विद्यार्थ्यांच्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स आयडीची नोंदणी अनिवार्य करावी. तसेच, चौथ्या वर्षाच्या प्रवेशासाठी महाविद्यालयांनी त्यांच्याकडील पायाभूत सुविधा आणि प्राध्यापकांची उपलब्धता तपासूनच जागा निश्चित कराव्यात.