मुंबई – पुणे प्रवास सुसाट – एक मेपासून नवीन मार्गिका खुली होणार
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवासाचा चेहरामोहरा बदलणारा मिसिंग लिंक’ प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या प्रकल्पाचे नव्व्याण्णव टक्के काम पूर्ण झाले असून एक मे रोजी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या नवीन मार्गिकेमुळे घाटातील धोकादायक वळणे आणि वाहतूक कोंडीतून प्रवाशांची कायमची सुटका होणार आहे.
मिसिंग लिंक प्रकल्पातील सर्वात मोठे आव्हान असलेला सहाशे पन्नास मीटर लांबीचा केबल-स्टेड पूल अखेर १२ मार्च २०२६ रोजी यशस्वीरित्या जोडण्यात आला आहे. टायगर व्हॅलीवर उभारलेला हा पूल जमिनीपासून सुमारे एकेश ब्याऐंशी मीटर उंच असून तो भारतातील सर्वात उंच रस्ते पुलांपैकी एक ठरला आहे. या पुलाच्या दोन्ही टोकांची जोडणी पूर्ण झाल्याने आता केवळ डांबरीकरण, रंगरंगोटी आणि अंतर्गत तांत्रिक कामांना वेग आला आहे.
या मिसिंग लिंकमुळे मुंबई-पुणे प्रवास वेगवान, सुरक्षित आणि सुखकरही होणार आहे. प्रवाशांची सुमारे पंचवीस ते तीस मिनिटे वाचणार आहेत. सध्या मुंबईहून पुण्याकडे जाताना बोरघाट ओलांडावा लागतो. येथील तीव्र चढ-उतार आणि नागमोडी वळणांमुळे जड वाहनांचा वेग मंदावतो आणि अनेकदा अपघातांमुळे तासनतास वाहतूक कोंडी होते. ही नवीन मार्गिका खोपोली एक्झिट ते कुसगाव दरम्यान थेट जोडली जाणार आहे.यामुळे वाहने थेट बोगद्यातून आणि पुलावरून प्रवास करतील, ज्यामुळे घाटातील अमृतांजन पॉइंट आणि तीव्र वळणांना पूर्णपणे बगल दिली जाईल. एमएसआरडीसीने स्पष्ट केले आहे की, जरी सिव्हिल काम पूर्ण झाले असले तरी, एप्रिल अखेरपर्यंत विविध लोड टेस्ट आणि सुरक्षा चाचण्या घेतल्या जातील. बोगद्यांमध्ये दर तीनशे मीटरवर आपत्कालीन बाहेर पडण्यासाठी मार्ग तयार करण्यात आले आहेत. आगीसारख्या घटना रोखण्यासाठी आधुनिक अग्निशमन यंत्रणा आणि हाय-टेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत. सुमारे सहा हजार सहाशे पंच्याण्णव कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचे काम २०१९ मध्ये सुरू झाले होते. नैसर्गिक आव्हाने, दरडी कोसळण्याच्या घटना आणि पावसाळ्यातील अडथळ्यांमुळे या प्रकल्पाला पूर्ण होण्यास विलंब झाला. मात्र, आता हा प्रकल्प राज्याच्या पायाभूत सुविधांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यासाठी सज्ज झाला आहे. मे महिन्यापासून मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खंडाळा घाटातील ट्रॅफिक विसरून निसर्गरम्य दरीच्या वरून आणि सह्याद्रीच्या पोटातून वेगवान प्रवासाचा अनुभव घेता येईल.