शिक्षकांना उन्हाळी सुटीत प्रशिक्षण
राज्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी उन्हाळी सुटीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथी या इयत्तांना नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. या नव्या अभ्यासक्रमाच्या अध्यापनासाठी राज्यातील शिक्षकांचे प्रशिक्षण चार मे पासून सुरू होणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने याबाबतचे वेळापत्रक जाहीर केले असून, ऐन उन्हाळी सुटीत हे प्रशिक्षण आयोजित केल्यामुळे शिक्षक वर्गातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
नव्या शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात मोठे बदल करण्यात आले आहेत. हे बदल शिक्षकांना समजावून सांगण्यासाठी तीन स्तरांवर प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे. चार ते सात मे मराठी आणि उर्दू माध्यमाच्या निवडक तज्ज्ञ शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण असेल. अकरा ते चौदा मे जिल्हा स्तरावरील सुलभकांसाठी हे प्रशिक्षण आयोजित केले जाईल. अठरा ते तीस मे या टप्प्यात शाळांमधील सर्व शिक्षकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. शाळा पंधरा जून रोजी सुरू होणार आहेत, त्यापूर्वी सर्व शिक्षकांचे हे प्रशिक्षण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे.
शिक्षण विभागाने दोन मे पासून शाळांना उन्हाळी सुटी जाहीर केली आहे. मात्र, चार मे पासूनच प्रशिक्षणाचे टप्पे सुरू होत असल्यामुळे शिक्षकांना यंदा सुटीचा आनंद घेता येणार नाही. वर्षभर विविध अशैक्षणिक कामांचा बोजा असलेल्या शिक्षकांसाठी सुटी हाच एकमेव विरंगुळा असतो, त्यावरही प्रशिक्षणाची गदा आली आहे, अशी भावना अनेक शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे. तथापि, हे प्रशिक्षण सर्व शिक्षकांसाठी बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नव्या धोरणानुसार २०२६-२७ पासून इयत्ता सहावीचाही अभ्यासक्रम बदलणे अपेक्षित होते. मात्र, इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमाला अद्याप अंतिम मंजुरी न मिळाल्यामुळे या प्रशिक्षणातून सहावीच्या शिक्षकांना तूर्त वगळण्यात आले आहे. सहावीच्या अभ्यासक्रमाबाबत आणि त्यांच्या प्रशिक्षणाबाबत स्वतंत्र सूचना नंतर दिल्या जातील, असे एससीईआरटीच्या सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांनी पत्राद्वारे कळवले आहे. फक्त सरकारीच नाही, तर खासगी विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहायित शाळांमधील शिक्षकांसाठीही हे प्रशिक्षण स्वतंत्रपणे आयोजित करता येणार आहे. मात्र, अशा शाळांसाठी सरकारकडून कोणतीही आर्थिक तरतूद किंवा मानधन दिले जाणार नाही, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ सुलभकांची नावे वीस एप्रिलपर्यंत कळवण्याचे आदेश जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांना देण्यात आले आहेत.