रत्नागिरी हापूसला बॅगिंगची संजीवनी
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली परिसरात हवामान बदलाचा मोठा परिणाम हापूस आंब्याच्या उत्पादनावर होत आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात मोहोर येऊनही समाधानकारक फळधारणा न झाल्याने शेतकरी चिंतेत असतानाच, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ‘बॅगिंग’ तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग केला आहे. या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे हापूस आंब्याची गुणवत्ता सुधारून उत्पादनाला नवी उभारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दापोली तालुक्यातील पांगारी आणि वाकवली परिसरात सुमारे एकशे अठ्ठ्याण्णव एकर क्षेत्रावर हापूस आंब्याची मोठी बाग आहे. एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी या कालावधीत येथे सुमारे आठ हजार झाडांची लागवड करण्यात आली होती. सद्यस्थितीत या भागात सहा हजार दोनशे पस्तीस झाडे उत्पादनक्षम आहेत. हे संपूर्ण क्षेत्र विद्यापीठाचे प्रायोगिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते, जिथे विविध पिकांवर सातत्याने संशोधनात्मक प्रयोग केले जातात.
कोकण कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ योगेश परुळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकवली येथील कृषी संशोधन केंद्रात निवडक झाडांवर बॅगिंग तंत्रज्ञानाचा प्रयोग करण्यात आला. फळधारणा झाल्यानंतर आंबा सुपारीसारख्या आकाराचा ते अंडाकृती होईपर्यंत त्यावर विशेष कागद किंवा कापडी पिशव्या चढवण्यात आल्या. या पिशव्यांमुळे फळांचे बाह्य घटकांपासून संरक्षण होते आणि त्यांची प्रत कमालीची सुधारते.
या तंत्रज्ञानाचा मुख्य फायदा म्हणजे आंब्यावर चिकामुळे पडणारे काळे डाग पूर्णपणे टाळता येतात. तसेच फळमाशी आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव होत नसल्याने फळ अधिक आकर्षक रंगाचे आणि दर्जेदार तयार होते. संशोधना दरम्यान असेही निरीक्षण नोंदवण्यात आले आहे की, बॅगिंग केलेल्या फळांचे वजन साधारणपणे दहा टक्क्यांनी वाढते, ज्यामुळे उत्पादनातही भर पडते.
या यशस्वी प्रयोगामुळे रत्नागिरी हापूसची निर्यातक्षमता वाढण्याची मोठी आशा निर्माण झाली आहे. प्रक्षेत्र संचालक अरुण माने, प्रक्षेत्रप्रमुख डॉ. संदीप महाडिक आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. सखाराम देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग पूर्ण करण्यात आला. भविष्यात या तंत्रज्ञानाचा सर्वसामान्य शेतकऱ्यांनी व्यापक वापर केल्यास हापूस आंब्याला जागतिक बाजारपेठेत अधिक चांगली किंमत आणि मोठी संधी मिळू शकते.