राज्यात अवकाळी पावसाचा इशारा
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानाचा पारा चव्वेचाळीस अंशांच्या पार गेला असतानाच, आता राज्यात 19 ते 22 एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या या अंदाजामुळे उन्हाच्या तीव्र झळांपासून काही प्रमाणात सुटका होण्याची चिन्हे आहेत.
गेल्या आठवड्यात राज्याच्या अनेक भागांत उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळाली. विदर्भातील अकोला आणि अमरावतीमध्ये तापमानाची नोंद चव्वेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकी झाली, तर पुण्यातील लोहगाव परिसराचा पाराही बेचाळीस अंशांपर्यंत पोहोचला होता. मुंबई, जळगाव, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांतही उष्ण व दमट हवामानामुळे नागरिक त्रस्त झाले होते. अनेक ठिकाणी दुपारी घराबाहेर पडणे कठीण झाले होते. हवामान तज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात पुन्हा एकदा वातावरणात बदल होत आहेत. 18 एप्रिलपासून पुढील चार दिवस राज्याच्या विविध भागांत पावसाचा अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाडा या भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता जास्त आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूरसह कोकणातील काही भागांत रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मुंबई – पुण्याच्या भागात या भागात अंशतः ढगाळ वातावरण राहून पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
एकीकडे सर्वसामान्यांना कडक उन्हापासून दिलासा मिळणार असला, तरी बळीराजाची चिंता मात्र वाढली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आधीच पिकांचे नुकसान झाले होते. आता पुन्हा पावसाचा इशारा आल्यामुळे काढणीला आलेल्या पिकांना आणि फळबागांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वातावरणातील या बदलामुळे तापमानातील चढ-उतार आरोग्यावर परिणाम करू शकतात. पावसाळी वातावरणामुळे वातावरणात आर्द्रता वाढेल, ज्यामुळे उकाडा अधिक जाणवू शकतो. प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पुढील चार दिवस राज्यासाठी महत्त्वाचे असून, या अवकाळी पावसामुळे एप्रिलमधील उष्णतेची लाट काही काळ ओसरण्याची शक्यता आहे.