
जपानमध्ये वीस एप्रिल रोजी झालेल्या शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्यानंतर संपूर्ण देशात सतर्कतेचा इशारा जाहीर करण्यात आला आहे. जपानच्या हवामान विभागाने पन्हा एकदा शक्तिशाली भूकंपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे सध्या तिथे पर्यटनासाठी जाणाऱ्या किंवा तिथे असलेल्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जपान सरकारने प्रवाशांसाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. यासोबतच पर्यटकांना किनारपट्टीच्या भागापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
या भूकंपामुळे इवाते, ओमोरी आणि होक्काइडो या प्रांतांमध्ये खळबळ उडाली होती. या धक्क्यांनंतर लगेचच प्रशासनाने दहा फूट उंचीच्या त्सुनामी लाटांचा इशारा दिला होता. कुजी आणि मियाको बंदरांवर साधारण ऐंशी सेंटिमीटर ते चाळीस सेंटिमीटर उंचीच्या लाटांची नोंद झाली. सुदैवाने, त्सुनामीचा हा इशारा नंतर मागे घेण्यात आला असला, तरी हवामान विभागाने पुढील आठवडाभर सतर्क राहण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे, आठ रिश्टर स्केल किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा दुसरा भूकंप येण्याची शक्यता नेहमीपेक्षा दहा पटीने वाढली असल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे. त्यामुळेच विशेष मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आली असून ती २७ एप्रिल २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. तुम्ही जर जपानला जाण्याचा विचार करत असाल, तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. सध्या शिन-चितोसे आणि सेंडाई यांसारखी महत्त्वाची विमानतळे सुरू आहेत. मात्र, आपत्कालीन स्थितीनुसार उड्डाणांच्या वेळा बदलू शकतात. उत्तर जपानमधील बुलेट ट्रेन सेवा काही काळासाठी विस्कळीत झाली होती. प्रवाशांनी प्रवासापूर्वी अधिकृत वेबसाइटवर रेल्वेचे वेळापत्रक तपासावे. अनेक देशांच्या दूतावासांनी आपल्या नागरिकांना प्रवासापूर्वी पुरेसा विमा घेण्याचा सल्ला दिला आहे, ज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीचा समावेश असेल. सध्याच्या इशाऱ्यानुसार, होक्काइडो, ओमोरी, इवाते, मियागी, फुकुशिमा, इबाराकी आणि चिबा या प्रांतांमधील नागरिकांना आणि पर्यटकांना विशेष दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या भागातील समुद्रकिनारे आणि नद्यांच्या मुखांजवळ जाणे टाळावे, कारण लाटांचा प्रवाह अचानक वाढू शकतो.
जपान सरकारच्या अधिकृत ॲप्सचा वापर करा, जे थेट तुमच्या भाषेत सूचना देतात. तुम्ही ज्या हॉटेल किंवा ठिकाणी थांबला आहात, तिथल्या आपत्कालीन बाहेर पडण्याच्या मार्गांची आणि जवळच्या उंच ठिकाणांची माहिती करून घ्या. भारतीय प्रवाशांनी जपानमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहावे आणि आपल्या वास्तव्याची माहिती स्टेप सारख्या प्रोग्राम्सद्वारे नोंदवावी, असा सल्ला भारतीय दूतावासाने पर्यटकांना दिला आहे. प्रशासनाकडून येणाऱ्या प्रत्येक सूचनेचे काटेकोरपणे पालन करा आणि अफवांवर विश्वास न ठेवता स्थानिक प्रसारमाध्यमांच्या बातम्यांवर लक्ष ठेवा, असेही त्यांनी सांगितले आहे.