बसस्थानकांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध बसस्थानके, कार्यालये आणि कार्यशाळांच्या छतावर सौर ऊर्जा प्रणाली बसवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे एसटी आता केवळ प्रवाशांची ने-आणच करणार नाही, तर स्वतःची वीजही स्वतःच निर्माण करणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे तेरा कोटी तीन लाख रुपयांच्या प्रशासकीय आणि वित्तीय खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. याअंतर्गत एसटीच्या विविध मालमत्तांच्या छतावर दोन पूर्णांक सत्तावन्न मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. ही प्रणाली विद्युत ग्रीडशी जोडलेले असल्याने निर्माण झालेली जादा वीज मुख्य वीज वाहिन्यांमध्येही सोडता येईल.
एसटी महामंडळाला सध्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. दरवर्षी वीज बिलापोटी महामंडळाला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. या सौर प्रकल्पामुळे एसटीच्या पारंपारिक वीज खर्चात दरवर्षी सुमारे तीन ते चार कोटी रुपयांची बचत होणे अपेक्षित आहे. महामंडळाचे दीर्घकालीन उद्दिष्ट तीनशे मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे असून, त्याद्वारे वर्षाला तब्बल एक हजार कोटी रुपयांची बचत करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे महामंडळाचे सरकारी अनुदानावरील अवलंबित्व कमी होईल आणि ते आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होईल. हा प्रकल्प केवळ आर्थिक बचतीसाठी नसून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठीही महत्त्वाचा आहे. सौर ऊर्जेचा वापर वाढल्यामुळे कार्बन उत्सर्जनात घट होईल. हरित ऊर्जा वापराच्या दिशेने हे एसटीचे एक मोठे पाऊल ठरणार आहे. विशेषतः भविष्यात ताफ्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक बसेसच्या चार्जिंगसाठी ही सौर ऊर्जा अत्यंत फायदेशीर ठरेल. मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की, प्रकल्पाची अंमलबजावणी करताना तांत्रिक मान्यता, नमुना नकाशे आणि पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन केले जाईल. बसस्थानके, आगारे, आणि मोठ्या कार्यशाळा जिथे मोकळी छत उपलब्ध आहे, तिथे ही यंत्रणा बसवण्यात येईल. या उपक्रमामुळे ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि आर्थिक शिस्त या तिन्ही आघाड्यांवर सकारात्मक परिणाम दिसून येतील.