नोकरी आणि कौशल्यासाठी महाचतुरची मदत
राज्य सरकारने राज्यातील तरुण पिढीला रोजगाराच्या संधी आणि कौशल्य विकासाचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाचतुर एआय चॅटबॉट या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागामार्फत विकसित करण्यात आलेला हा देशातील अशा प्रकारचा पहिलाच सरकारी चॅटबॉट ठरला आहे.
मुंबईतील झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. भारताची पासष्ट टक्के लोकसंख्या पस्तीस वर्षांखालील असून, हा लोकसंख्याशास्त्रीय लाभ देशाच्या प्रगतीसाठी संधी आहे. या युवा शक्तीला केवळ शिक्षणच नाही, तर उद्योगांना आवश्यक असणारे कौशल्य प्रशिक्षण देऊन अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. महाचतुर चॅटबॉट नेमकी हीच गरज पूर्ण करेल. या चॅटबॉटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे व्हॉट्सॲपवर उपलब्ध आहे. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील तरुणांना माहिती मिळवण्यासाठी कोणत्याही क्लिष्ट वेबसाइटवर जाण्याची गरज नाही. एका साध्या मेसेजद्वारे विविध कोर्सेसची माहिती आणि प्रवेश प्रक्रिया, खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकऱ्यांची संधी, स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी सल्ला आणि माहिती, उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन या सुविधा उपलब्ध होतील. यापूर्वी राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रोत्साहन योजना आणि महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना अंतर्गत नोंदणी करण्यासाठी तरुणांना दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत असे. मात्र, या एआय चॅटबॉटमुळे ही संपूर्ण प्रक्रिया आता केवळ पंधरा मिनिटांत पूर्ण होणार आहे. यामुळे तरुणांचा वेळ वाचेल आणि त्यांना त्वरित संधी उपलब्ध होतील.
महाचतुर चॅटबॉट हा राईट वॉक फाऊंडेशनच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा चॅटबॉट सरकारी सर्व्हरवर कार्यरत असून तो ‘ओपन सोर्स’ तंत्रज्ञानावर आधारित आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांच्या माहितीची पूर्ण सुरक्षा राखली जाते. या प्रसंगी विविध जागतिक आणि राष्ट्रीय संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये आयपीई ग्लोबल, युएन वुमन, आणि श्रीमद राजचंद्र एज्युकेशनल ट्रस्ट यांसारख्या संस्थांचा समावेश आहे. या भागीदारीमुळे विशेषतः महिलांचा कौशल्य उपक्रमातील सहभाग वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. उद्योगांना कुशल कामगार हवे आहेत आणि तरुणांना नोकरी हवी आहे, परंतु या दोघांमध्ये योग्य संवादाचा अभाव होता. महाचतुर हा चॅटबॉट या दोन्ही घटकांमधील दुवा म्हणून काम करेल. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगारापर्यंतचा प्रवास सुलभ करण्यासाठी हे एक क्रांतिकारक साधन ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.