असं वेगळं गाव – अतरंगी गावाचं अंतरंग

झी स्टुडिओज निर्मित ‘तुंबाडची मंजुळा’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. या चित्रपटातील गूढ आणि त्यातील पात्रांची अतरंगी झलक पाहून हे गाव नेमकं कसं असेल, असे प्रश्न रसिकांना पडले होते. याच प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटातील पहिले गाणे ‘असं वेगळं गाव’ नुकतेच २३ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित केले असून, ते सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहे.

या गाण्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शास्त्रीय संगीतातील दिग्गज नाव राहुल देशपांडे आणि मराठी सिनेसृष्टीची ‘लाडकी आर्या’ अर्थात आर्या आंबेकर यांचा स्वरसाज या गाण्याला लाभला आहे. हे दोन्ही कलाकार प्रथमच एका गाण्याच्या निमित्ताने एकत्र आले असून त्यांच्या आवाजातील जादू या गाण्यात स्पष्टपणे जाणवते. राहुल देशपांडे यांचा भारदस्त आणि आधुनिक धाटणीचा आवाज आणि आर्या आंबेकरची मधाळ गायकी यामुळे या गाण्याला एक वेगळीच उंची लाभली आहे. राहुल देशपांडे यांच्या मते, या गाण्याचे संगीत अत्यंत आधुनिक असले तरी त्यात मातीचा आणि गावाकडचा गंध जपण्यात आला आहे, जे प्रेक्षकांना आपल्याकडे खेचून घेते.

‘असं वेगळं गाव’ हे गाणे केवळ एक गीत नसून ते गावकऱ्यांच्या अतरंगी आणि सतरंगी स्वभावाची एक मनमोहक झलक सादर करते. कोकणातील निसर्गरम्य लोकेशन्सवर या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले असून, हिरवाईने नटलेला परिसर आणि गावातील साधेपणा या गाण्यातून प्रभावीपणे टिपला आहे. विक्रम एडके यांचे शब्द असलेल्या या गाण्याला असीम कुऱ्हेकर, प्रतीक केळकर आणि तेजस जोशी या संगीतकार त्रयींनी अतिशय सुंदर चाल लावली आहे. गुण्यागोविंदाने नांदणारे आणि आपुलकीने बांधलेले हे गाव या गाण्याामुळे जिवंत झाल्यासारखे वाटते. गावातील प्रत्येक व्यक्तिरेखा, त्यांची वेगळी ढब, त्यांची मस्ती, त्यांच्या नात्यांमधील ऊब आणि एकमेकांबद्दलचं निखळ प्रेम या सगळ्यांचा सुरेल संगम या गाण्यात अनुभवायला मिळतो. हे गाणं मातीशी घट्ट जोडलेलं, गावकुसातील जीवनाचं प्रतिबिंब दाखवणारं आहे. कोकणच्या मातीतील सौंदर्य आणि तिथल्या माणसांचा साधेपणा गाण्यातून अचूकपणे मांडला आहे.

ऋषिकेश तुरई यांच्या लेखणीतून उतरलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विविध कोरगांवकर यांनी केले आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे आणि उषा नाडकर्णी यांसारख्या दिग्गज कलाकारांची तगडी फळी पाहायला मिळणार आहे. झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांच्या मते, हे गाणे चित्रपटाचा नेमका सूर काय असेल, हे अधोरेखित करते. हे गाणे रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर रिल्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.






8,259 वेळा पाहिलं