
देशाच्या सोळाव्या जनगणनेचा बिगुल अखेर वाजला असून, राज्यात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आजपासून या मोहिमेला सुरुवात होत आहे. ही जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपाची असून, प्रथमच नागरिकांना स्व-गणना करण्याची विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ऐतिहासिक टप्प्याबाबत राज्याच्या मुख्य जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
जनगणनेची ही मोहीम दोन मुख्य टप्प्यांत राबविली जाणार आहे. एक मे ते चौदा जून २०२६ या पहिला टप्प्यात घरांची यादी तयार करणे आणि घरांची स्थिती जाणून घेणे यावर लक्ष केंद्रित केले जाईल. फेब्रुवारी २०२७ मध्ये दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्या गणना होईल, ज्यामध्ये जातीनिहाय माहिती देखील संकलित केली जाण्याची शक्यता आहे. नागरिकांचा सहभाग सुलभ करण्यासाठी सरकारने एक ते पंधरा मे २०२६ या कालावधीत ऑनलाइन पोर्टल खुले केले आहे. नागरिक अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वतःची माहिती भरू शकतात. आधार कार्ड किंवा मोबाईल क्रमांकाद्वारे लॉगिन करून कुटुंबातील कोणताही एक जबाबदार सदस्य पंधरा ते वीस मिनिटांत ही माहिती भरू शकतो. माहिती पूर्ण भरल्यानंतर एक स्व-गणना ओळख क्रमांक तयार होईल, जो जतन करून ठेवणे आवश्यक आहे.
ज्या नागरिकांनी ऑनलाइन माहिती भरलेली नाही, त्यांना घाबरण्याचे कारण नाही. सोळा मे ते चौदा जून २०२६ या कालावधीत सुमारे दोन पूर्णांक चौसष्ट लाख प्रगणक प्रत्यक्ष घरोघरी भेट देतील. जर तुम्ही स्व-गणना केली असेल, तर तुम्हाला फक्त प्रगणकांना तुमचा आयडी दाखवावा लागेल. प्रगणक त्या आयडीची पडताळणी करून तुमची नोंदणी पूर्ण करतील. ज्यांनी स्व-गणना केलेली नाही, त्यांची माहिती प्रगणक त्यांच्याकडील मोबाईल ॲपद्वारे प्रत्यक्ष भेट घेऊन नोंदवतील. जनगणनेमध्ये विचारली जाणारी माहिती पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय राहील, असे डॉ. निरुपमा डांगे यांनी स्पष्ट केले आहे. या माहितीचा वापर कोणत्याही पोलीस तपासात, न्यायालयीन प्रक्रियेत किंवा माहिती अधिकारांतर्गत दिला जाणार नाही. माहिती संकलनासाठी तेहत्तीस प्रश्न विचारले जातील, ज्यात घराचे स्वरूप, पिण्याच्या पाण्याचा स्रोत, शौचालयाची सुविधा, वापरले जाणारे इंधन आणि कुटुंबातील भौतिक साधनांचा समावेश असेल. डिजिटल प्रक्रियेचा फायदा घेत सायबर गुन्हेगार फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, केवळ अधिकृत पोर्टलचाच वापर करावा, अशी सूचना करण्यात आल्या आहेत.