
युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या काळ्या समुद्रकिनाऱ्यावरील तुआप्से शहरातील तेल साठवण केंद्रावर हल्ला चढविला आहे. गेल्या दोन आठवड्यांहून अधिक कालावधीत या भागातील तेलविषयक पायाभूत सुविधांवर झालेला हा चौथा हल्ला आहे. रशियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या मानवरहित विमानांनी केलेल्या या हल्ल्यामुळे तेलतळावर भीषण आग लागली असून धुराचे लोट उसळले आहेत.
या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यापूर्वीही गेल्या महिन्याच्या 16 ,20 आणि 28 तारखेला याच केंद्रावर अशाच प्रकारचे हल्ले झाले होते. वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे तुआप्से परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रशियन लष्कराकडून खबरदारीचे उपाय वाढवले जात आहेत.
दुसरीकडे, रशियानेही युक्रेनवरील आपले प्रतिहल्ले अधिक तीव्र केले आहेत. पश्चिम युक्रेनमधील टर्नोपिल शहरावर रशियाने आज पन्नासहून अधिक मानवरहित विमानांद्वारे हल्ला केला. शहराचे महापौर सेर्ही नादाल यांनी या हल्ल्याची माहिती देताना सांगितले की, रशियन आक्रमणामुळे शहरातील नागरी सुविधांचे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये दहशतीचे सावट आहे.
युक्रेनच्या दक्षिणेकडील ओदेसा प्रदेशातही रशियन सैन्याने रात्रीच्या वेळी जोरदार हल्ले केले. या आक्रमणात दोन बहुमजली निवासी इमारती आणि बंदराशी संबंधित पायाभूत सुविधांचे प्रचंड नुकसान झाले आहे. एका सोळा मजली इमारतीतील एक सदनिका या हल्ल्यात पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून इमारतीच्या छताला भीषण आग लागल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत.
दुसऱ्या एका उंच निवासी इमारतीच्या बाराव्या मजल्यालाही आग लागल्याचे युक्रेनच्या आपत्कालीन सेवा विभागाने सांगितले आहे. राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी या घटनेत किमान पाच नागरिक जखमी झाल्याची माहिती दिली. बाधितांना मदत पोहोचवण्यासाठी आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.