
पश्चिम बंगालमधील निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले. यामुळे आता तिथे भाजपची सत्ता येणार हे निश्चित झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधिमंडळ नेतेपदी सुवेंदू अधिकारी यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर तेच मुख्यमंत्री होणार हे नक्की झाले होते. त्या प्रमाणे आज शनिवार, दिनांक ९ मे २०२६ रोजी त्यांचा शपथविधी पार पडला आणि ते पश्चिम बंगालच्या नवव्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य शपथविधी सोहळ्यात राज्यपाल आर. एन. रवी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या ऐतिहासिक सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह देशभरातील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दोनशे त्र्याण्णव जागांपैकी दोनशे सात जागांवर अभूतपूर्व विजय मिळवून स्पष्ट बहुमत प्राप्त केले. गेल्या पंधरा वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला केवळ ऐंशी जागांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, भवानीपूर मतदारसंघातून स्वतः ममता बॅनर्जी यांचा पराभव करून सुवेंदू अधिकारी राज्याच्या राजकारणातील सर्वात प्रभावशाली चेहरा म्हणून समोर आले आहेत.
शपथविधी सोहळ्याच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुवेंदू अधिकारी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य एका विशेष रथातून व्यासपीठाकडे रवाना झाले. या कार्यक्रमात मोदी यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या सहकाऱ्यांचे आशीर्वाद घेतले आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली. या सोहळ्याला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुमारे वीस राज्यांचे मुख्यमंत्री या विशेष सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी कोलकात्यात दाखल झाले होते.
शुभेंदू अधिकारी यांच्यासोबतच दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, खुदीराम टुडू आणि निशिथ प्रामाणिक यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. या नवीन मंत्रिमंडळाकडून बंगालच्या जनतेला मोठ्या अपेक्षा असून सत्तेच्या या विकेंद्रीकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तृणमूल काँग्रेसमधून आपला राजकीय प्रवास सुरू करणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांनी नंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि बंगालमध्ये पक्ष संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्यात मोलाची भूमिका बजावली. नंदीग्राम आणि भवानीपूर यांसारख्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये त्यांनी ममता बॅनर्जी यांना कडवे आव्हान देऊन आपली क्षमता सिद्ध केली होती. आता त्यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये प्रशासन, विकास आणि कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत सकारात्मक बदल घडतील, अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.