भारत – सायप्रसमध्ये धोरणात्मक भागीदारी

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात सायप्रस गणराज्याचे राष्ट्रपती निकोस ख्रिस्तोदौलिदेस यांचे उत्साहात स्वागत केले. सायप्रसचे राष्ट्रपती सध्या भारताच्या चार दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत. या प्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या सन्मानार्थ एका विशेष स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. राष्ट्रपतींनी सायप्रसच्या प्रमुखांचे आणि त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळाचे स्वागत करत दोन्ही देशांमधील संबंध परस्पर विश्वास आणि सदिच्छेवर आधारलेले असल्याचे सांगितले.

दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आता एका महत्त्वाच्या धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर पोहोचले आहेत, असे राष्ट्रपती मुर्मू यांनी नमूद केले. हा विकास दोन्ही देशांमधील वाढती परिपक्वता, सखोलता आणि वाढता परस्पर विश्वास दर्शवतो. संरक्षण आणि सुरक्षा, तंत्रज्ञान, वित्तीय सेवा, दळणवळण आणि सागरी सहकार्य यांसारख्या प्राधान्यक्रमाच्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देश सहकार्य वाढवत असून भारत-सायप्रस संबंध एका नवीन टप्प्यात प्रवेश करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

भारतात होणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीचा सायप्रस हा एक प्रमुख स्रोत राहिलेला आहे, याकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधले. सायप्रसमधील अनेक कंपन्या भारतासोबतचे व्यापारी आणि गुंतवणूक संबंध अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक आहेत. भारताची बाजारपेठ, डिजिटल क्षेत्रातील प्रगती, पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रातील क्षमता सायप्रसच्या कंपन्यांना आणि गुंतवणूकदारांना संधी उपलब्ध करून देतात, असे प्रतिपादन त्यांनी केले.

तंत्रज्ञान आणि नाविन्यता हे भारत-सायप्रस संबंधांमधील भविष्यातील सर्वात महत्त्वाचे क्षेत्र म्हणून उदयास आले आहे. भारताची तरुण प्रतिभा, तांत्रिक क्षमता आणि नवउद्यम पर्यावरण व्यवस्था सायप्रसच्या नाविन्यपूर्ण व्यवस्थेला पूरक ठरू शकते. दोन्ही देशांमध्ये अर्धवाहके, अक्षय ऊर्जा, हरित ऊर्जा, अंतराळ संशोधन, शाश्वत विकास आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या नवीन क्षेत्रांमध्ये सहकार्याची प्रचंड क्षमता असल्याचे राष्ट्रपती मुर्मू यांनी अधोरेखित केले.

युरोपीय संघ परिषदेच्या अध्यक्षपदाच्या काळात, भारत आणि युरोपमधील आर्थिक सहकार्य वाढवण्यात सायप्रस महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, विशेषतः भारत-युरोपीय संघ मुक्त व्यापार कराराच्या अंमलबजावणीनंतर ही प्रक्रिया अधिक गतीने पुढे जाईल. सीमापार दहशतवाद आणि बहुपक्षीय संस्थांमधील सुधारणा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सायप्रसने भारताला दिलेल्या पाठिंब्याची राष्ट्रपतींनी प्रशंसा केली. तसेच सायप्रसचे सार्वभौमत्व, एकता आणि प्रादेशिक अखंडतेला भारताचा नेहमीच भक्कम पाठिंबा राहील, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
8,833 वेळा पाहिलं