मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
जून महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईत मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रविवारी मुंबईतील विविध भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या वळवाच्या सरी बरसल्या. यामुळे गेले काही दिवस उष्णतेने हैराण झालेल्या मुंबईकरांना काही काळ वातावरणात गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला. मात्र, पाऊस पडून गेल्यानंतर दुपारच्या वेळी शहरात पुन्हा उष्ण आणि दमट वातावरण निर्माण झाले. यामुळे नागरिकांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागला.
रविवारी सकाळी सहा ते नऊ वाजेच्या सुमारास मुंबईतील चेंबूर, कुर्ला, विलेपार्ले, घाटकोपर, वांद्रे, विक्रोळी, अंधेरी, बोरिवली, कांदिवली, गोरेगाव, पवई, दादर आणि मालाड या भागांत पावसाने हजेरी लावली. पूर्व उपनगरात सर्वाधिक सव्वीस मिलिमीटर पावसाची नोंद चेंबूर येथे झाली. त्याखालोखाल मानखुर्द येथे बावीस मिलिमीटर, घाटकोपर येथे अकरा मिलिमीटर आणि कुर्ला येथे दहा मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. तसेच पश्चिम उपनगराचा विचार करता सर्वाधिक पाऊस वांद्रे कुर्ला संकुल येथे बावीस मिलिमीटर इतका नोंदला गेला.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबईतील तापमानाचा पारा पस्तीस अंश सेल्सिअसवर स्थिर होता. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात चौतीस दशांश आठ अंश सेल्सिअस तर कुलाबा केंद्रात पस्तीस दशांश आठ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, जे सरासरी कमाल तापमानापेक्षा एक दशांश सात अंश सेल्सिअसने अधिक होते. याशिवाय किमान तापमान कुलाबा येथे एकोणतीस अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे सव्वीस दशांश नऊ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचा मे महिना मुंबईकरांसाठी अधिक तापदायक ठरला होता.
भारतीय हवामान विभागाने मुंबई शहर आणि उपनगरासाठी पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. विशेषतः सोमवार आणि मंगळवारी हवामान विभागाकडून मुंबईसाठी पिवळा इशारा (यलो अलर्ट) जारी करण्यात आला आहे. सोमवारी संध्याकाळी किंवा रात्रीच्या सुमारास मुंबईत मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सोमवारसाठी मुंबईचे कमाल तापमान चौतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
मुंबईसोबतच शेजारील ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही मान्सूनपूर्व घडामोडींना वेग आला असून तेथेही उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. हवामान विभागाने या दोन्ही जिल्ह्यांसाठी सोमवारी वादळी पावसाचा इशारा दिला आहे. या काळात मेघगर्जनेसह, विजांचा कडकडाट होऊन ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या प्रादेशिक भागांमधील अंतर्गत भागात सध्या उष्मा अधिक असला, तरी या आगामी पावसामुळे नागरिकांना तीव्र उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.