
लेह जिल्ह्यात उपशी येथे देशातील पहिल्या वहिल्या दगडी धरणाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडले. हे धरण सिंधू नदीवर उभारण्यात आले आहे. नायब राज्यपालांनी या विशेष मोहिमेला सिंधू जल समृद्धी अभियान असे नाव दिले आहे. हे धरण लडाखमधील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कमी खर्चाचे आणि शाश्वत माध्यम ठरणार आहे. यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे, असे मत नायब राज्यपालांनी व्यक्त केले.
हे धरण लेहपासून चव्वेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासून तब्बल अकरा हजार चारशे फूट उंचीवर हे धरण बांधण्यात आले आहे. लडाखमध्ये पेरणीच्या मुख्य हंगामात सिंधू नदीचे पाणी खूप उथळ होते. ज्यामुळे नेहमीच्या पंपांच्या साहाय्याने पाणी उंचावरील शेतांपर्यंत उपसणे शेतकऱ्यांना अशक्य होते. ही गंभीर समस्या दूर करण्यासाठी नदीच्या अरुंद पात्रात हे वैशिष्ट्यपूर्ण धरण उभारण्यात आले आहे. यामुळे पाणी अडवून ते शेतीसाठी वापरणे सोपे होईल.
या धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या बांधकामात सिमेंट किंवा काँक्रीटचा अजिबात वापर करण्यात आलेला नाही. नदीच्या पात्रातील आणि आजूबाजूच्या परिसरातील दगड आणि धोंडे आणून ते एकमेकांत घट्ट गुंफून हे धरण अवघ्या सात दिवसांमध्ये म्हणजेच एका आठवड्यात बांधून पूर्ण केले गेले. यामध्ये पाचशे किलोग्रॅमपासून ते तब्बल दहा मेट्रिक टनांपर्यंत वजनाचे एकूण एकशे ऐंशी मेट्रिक टन दगड वापरण्यात आले आहेत. हे धरण जवळपास दोनशे फूट लांब, तळाशी तीस फूट रुंद आणि नदीपात्रापासून पाच फूट उंच आहे.
केवळ सात दिवसांत पूर्ण झालेल्या या प्रकल्पामुळे नदीच्या वरच्या बाजूला पंधराशे फूट लांबीचा एक विस्तीर्ण पाण्याचा साठा तयार झाला असून, त्यामध्ये सुमारे चार कोटी लिटर पाणी साठवले गेले आहे. नदीच्या कडेला पाण्याची खोली चार ते पाच फूट असून, मधोमध ती दहा फुटांपर्यंत पोहोचली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जेव्हा बर्फ वितळून नदीचा प्रवाह पंचवीस क्युसेकवरून थेट दोनशे क्युसेकपर्यंत म्हणजे आठ पटीने वाढतो, तेव्हाही पाण्याचा प्रचंड दाब सहन करू शकेल अशा भक्कम पद्धतीने या धरणाची रचना करण्यात आली आहे.
नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी जल आणि पूर नियंत्रण विभागाला अशाच प्रकारचे आणखी तीन प्रयोगिक धरणे येत्या एका महिन्याच्या आत बांधण्याचे निर्देश दिले आहेत. स्थानिक गावकरी आणि नागरिकांशी चर्चा करूनच या धरणाची जागा निश्चित करण्यात आली होती. यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या ‘प्रकल्प हिम सरोवर’ च्या यशानंतर लडाखच्या नाजूक परिसंस्थेला कोणतीही हानी न पोहोचवता राबवलेले हे अभियान संपूर्ण देशासाठी आधुनिक अभियांत्रिकी आणि पर्यावरण रक्षणाचा एक उत्तम आदर्श ठरेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.