विदर्भातील शाळांसाठी सुधारित वेळापत्रक

दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळी सुट्ट्या संपवून शाळा पंधरा जून रोजी सुरु होत आहेत. मात्र, विदर्भात अद्याप तापमान खाली उतरलेले नाही. उन्हाच्या झळा अद्याप कायम आहेत. यामुळे शिक्षण संचालनालयाने नऊ जून २०२६ रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक जाहीर केले आहे. या सुधारित आदेशानुसार, विदर्भातील सध्या तीव्र उन्हाळा लक्षात घेता येथील शाळा उशिराने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विदर्भातील शाळा आता पंधरा जूनऐवजी सोमवार, बावीस जून दोन हजार सव्वीस पासून सुरू होणार आहेत.

जनहित याचिका आणि न्यायालयीन पार्श्वभूमी

सर्व शाळा पंधरा जून रोजी सुरू करण्याचे आदेश आधी देण्यात आले होते. मात्र, विदर्भातील तापमानाचा पारा प्रचंड वाढलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, ही बाब समोर आली होती. विदर्भातील या कडक उन्हाचा विचार करता शाळा सुरू करण्याबाबत नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शासनाने हा महत्त्वपूर्ण बदल केला आहे.

सकाळच्या सत्राचे नियोजन

बावीस जून ते तीस जून या कालावधीत विदर्भातील सर्व शाळा केवळ सकाळच्या सत्रात भरवल्या जातील. जेणेकरून दुपारच्या कडक उन्हाचा त्रास विद्यार्थ्यांना होणार नाही. त्यानंतर परिस्थिती पूर्ववत झाल्यावर एक जुलै दोन हजार सव्वीस पासून विदर्भातील सर्व शाळा पूर्ण वेळेत आणि नियमित वेळापत्रकानुसार भरतील, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

उर्वरित महाराष्ट्रातील स्थिती

या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, हा बदल केवळ विदर्भ विभागासाठी लागू राहील. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रातील सर्व शाळा पूर्वघोषित वेळापत्रकानुसार सोमवार, पंधरा जून दोन हजार सव्वीस पासूनच नियमित वेळेत सुरू होतील. उर्वरित महाराष्ट्रातील शाळांच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

प्रशासकीय आदेश आणि अंमलबजावणी

शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर आणि शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी हे आदेश जारी करण्यात आले आहेत. विदर्भातील सद्यस्थितीतील तापमान विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी हितावह नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांना या आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
3,435 वेळा पाहिलं