गुलाल – बैलगाडा शर्यतीची गोष्ट

महाराष्ट्राच्या मातीशी आणि संस्कृतीशी जोडलेला एक अत्यंत जिव्हाळ्याचा आणि प्रतिष्ठेचा खेळ म्हणजे ‘बैलगाडा शर्यत’. याच शर्यतीचा थरार, गावरान मातीचा गंध आणि मानवी नात्यांचे विविध पदर उलगडणारी ‘गुलाल’ ही नवी कोरी मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

नाम चित्रपट निर्मिती संस्थेने तयार केलेली ही मालिका युट्यूबवर प्रदर्शित झाली असून, आपल्या वेगळ्या विषयामुळे आणि प्रभावी मांडणीमुळे सध्या सामाजिक माध्यमांवर कमालीची लोकप्रिय होत आहे. ग्रामीण भागातील चुरस आणि कौटुंबिक नातेसंबंधांना एका नव्या दृष्टिकोनातून मांडण्याचा यशस्वी प्रयत्न या मालिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. ‘गुलाल’ या मालिकेची पार्श्वभूमी बैलगाडा क्षेत्राभोवती विणलेली आहे.

ग्रामीण भागात अटीतटीचा विषय मानल्या जाणाऱ्या बैलगाडा शर्यतीतील चढाओढ, त्यातून निर्माण होणारी जुनी दुश्मनी आणि या संघर्षाच्या गर्भातून फुलणारे एक हळवे प्रेम, असे अनेक रंजक पैलू कथेत पाहायला मिळतात. बैलगाडा मालकाचे आपल्या लाडक्या बैलावर असणारे जीवापाड प्रेम आणि त्यांच्यातील भावनिक नाते मालिकेत अत्यंत प्रकर्षाने रेखाटले आहे. केवळ मनोरंजन न करता, समाजात मुलींना दुय्यम स्थान देणाऱ्या जुनाट मानसिकतेला चोख उत्तर देत, एक जिद्दी मुलगी प्रत्येक क्षेत्रात कशी आत्मविश्वासाने आणि धैर्याने उभी राहू शकते, हा अत्यंत महत्त्वाचा आणि पुरोगामी सामाजिक संदेश या मालिकेतून देण्यात आला आहे. या मालिकेचे आतापर्यंत तीन भाग प्रदर्शित झाले असून, प्रत्येक भागाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

२८ मे २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागाला ५,२०० पेक्षा जास्त लोकांनी पाहिले असून ३०० हून अधिक लोकांनी तो पसंत केला आहे. त्यानंतर दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली आणि काल ११ जून २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या मालिकेच्या तिसऱ्या भागालाही अवघ्या काही वेळातच हजारो लोकांनी पाहिले आहे, जे या मालिकेची कमालीची वाढती लोकप्रियता दर्शवते. कथेची खिळवून ठेवणारी मांडणी, कथेतील उत्कंठावर्धक वळणे आणि प्रत्येक भागातील उत्सुकता यामुळे प्रेक्षक पुढील भागात काय घडणार, याची आतुरतेने वाट पाहत असून प्रेक्षकांमध्ये या मालिकेच्या पुढील भागांबद्दलची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

मुख्य भूमिकेत स्वतः अभिमन्यु जाधव, भूमिका भोसले आणि सुयोग दळवी यांनी अप्रतिम काम केले आहे. दिग्दर्शनाची, लेखनाची आणि निर्मितीची त्रिवेणी धुरा सांभाळणाऱ्या अभिमन्यु जाधव यांनी ग्रामीण वातावरण हुबेहूब पडद्यावर जिवंत केले आहे. चैतन्य खिल्लारे यांचे चित्रीकरण अत्यंत दर्जेदार असून, ग्रामीण भागातील विहंगम दृश्ये आणि शर्यतीचा थरार त्यांनी कॅमेऱ्यात उत्तम टिपला आहे. संकलनाची बाजू देखील नेटकी झाली असून निर्मिती चमूतील पंकज माने, शुभम जाधव, शंभू पवार, प्रणव जाधव, अण्णा जाधव, आर्यन रायते आणि ओंकार लोंढे यांनी घेतलेली मेहनत पडद्यावर स्पष्ट जाणवते. एकंदरीत, ‘गुलाल’ ही मालिका केवळ मनोरंजनात्मक नसून मराठी डिजिटल विश्वात ग्रामीण संस्कृतीचा सन्मान करणारा एक नवा आणि दर्जेदार प्रयोग ठरत आहे, त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवेल यात शंका नाही.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
459 वेळा पाहिलं