डिझेल खरेदीवर मर्यादा

पेट्रोल आणि डिझेलचा सुरळीत पुरवठा कायम ठेवण्यासाठी सरकारने एक नवीन आदेश जारी केला आहे. नवीन नियमांनुसार, आता पेट्रोल पंपावर एका वाहनाला किंवा एका ग्राहकाला एका दिवसात जास्तीत जास्त दोनशे लिटरपर्यंतच डिझेल दिले जाईल.आंतरराष्ट्रीय पेट्रोलियम पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

किरकोळ आणि घाऊक दरांमधील तफावत

किरकोळ पेट्रोल पंप आणि घाऊक बाजारपेठेतील किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर भडकलेले आहेत. सर्वसामान्य जनतेला महागाईची झळ बसू नये म्हणून सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल पंपांवरील दर स्थिर ठेवले आहेत. मात्र, मोठ्या उद्योगांना घाऊक खरेदीसाठी प्रति लिटर तब्बल चाळीस रुपयांपर्यंत जास्त किंमत मोजावी लागत आहे. या किमतींमधील फरकामुळे टेलिकॉम टॉवर, वीज निर्मिती कंपन्या, कंत्राटदार आणि कारखाने यांसारखे औद्योगिक व व्यावसायिक ग्राहक आपला खर्च वाचवण्यासाठी सर्वसामान्यांच्या पेट्रोल पंपांवरून इंधन खरेदी करत होते.

इंधन खरेदीवर मर्यादा आणि नियम

या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने सर्वसामान्य ग्राहकांच्या तसेच वाहनांच्या इंधन खरेदीवर मर्यादा निश्चित केली आहे. नवीन नियमांनुसार, आता पेट्रोल पंपावर एका वाहनाला किंवा एका ग्राहकाला एका दिवसात जास्तीत जास्त दोनशे लिटरपर्यंतच डिझेल दिले जाईल. त्यापेक्षा अधिक इंधन एका दिवसात खरेदी करता येणार नाही. लांबच्या प्रवासाला निघणाऱ्या वाहनधारकांना आणि वाहतूकदारांना आता या नवीन नियमांनुसार आपल्या प्रवासाचे आणि इंधन खरेदीचे आगाऊ नियोजन करावे लागणार आहे, जेणेकरून प्रवासात त्यांचा खोळंबा होणार नाही.

पुनर्विक्रीवर बंदी आणि कंटेनरचे नियम

नवीन नियमावलीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, पेट्रोल पंपावरून खरेदी केलेले डिझेल पुढे कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला विकण्यास पूर्णपणे मनाई आहे. तसेच, हे डिझेल केवळ वाहनांच्या इंधन टाक्यांमध्ये किंवा ‘पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्हज सेफ्टी ऑर्गनायझेशन’ द्वारे अधिकृत मान्यता मिळालेल्या कंटेनर्स किंवा कॅनमध्येच घेता येईल. या नियमांमुळे किरकोळ बाजारातील इंधनाचा साठा सुरक्षित राहील आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी राखीव असलेला पुरवठा व्यावसायिक कारणांसाठी वळवला जाणार नाही, याची काळजी घेतली गेली आहे.

साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई

केंद्र सरकारने औद्योगिक, व्यावसायिक आणि संस्थात्मक ग्राहकांना पुढील नव्वद दिवसांपर्यंत थेट किरकोळ पेट्रोल पंपांवरून इंधन खरेदी करण्यास निर्बंध घातले असून त्यांनी त्यांच्या हक्काच्या व्यावसायिक वाहिन्यांद्वारेच खरेदी करावी, असे निर्देश दिले आहेत. मुंबईसह देशातील इतर मुख्य शहरांमध्ये या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. जर कोणी साठेबाजी, काळाबाजार, अनधिकृत विक्री किंवा तेलाचा गैरव्यवहार करताना आढळल्यास, त्यांच्यावर ‘अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत’ थेट फौजदारी आणि कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
5,949 वेळा पाहिलं