
अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील वीज निर्मिती केंद्रांवर होणारे नियोजित हल्ले पाच दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात अलीकडेच सकारात्मक आणि फलदायी चर्चा झाल्याचे सांगत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या समाज माध्यमावर सांगितले आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या संघर्षात तात्पुरती शांतता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी अठ्ठेचाळीस तासांची अंतिम मुदत दिली होती. अन्यथा इराणच्या ऊर्जा आणि वीज केंद्रांवर हल्ला करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, उभय देशांतील चर्चेतील प्रगती पाहता हा कठोर निर्णय तात्पुरता पुढे ढकलण्यात आला आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यातील ही चर्चा मागील दोन दिवसांपासून सुरू होती आणि ती पुढील आठवडाभर सुरू राहणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. या कालावधीत दोन्ही देशांमध्ये सुरू असलेला संघर्ष पूर्णपणे संपवण्यासाठी ठोस मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
दरम्यान, इराणनेही अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला होता. इराणने आखाती प्रदेशातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर आणि इस्रायलमधील वीज केंद्रांवर हल्ला करण्याची धमकी दिल्यामुळे आंतरराष्ट्रीय परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली होती.
या संघर्षाचा जागतिक ऊर्जा बाजारावरही मोठा परिणाम झाला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील खनिज तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे, या भागातील तणावामुळे तेलाच्या किमतीत मोठे चढ-उतार झाले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही या सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.