विड्याच्या पानाची शेती
विड्याच्या पानाची शेती ही भारतातील पारंपरिक आणि नफ्याची शेती मानली जाते. विशेषतः महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बिहार या राज्यांत पानाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. पानाचा वापर पूजाविधी, पाहुणचार तसेच रोजच्या खाण्यात केला जात असल्यामुळे त्याला बाजारात सतत मागणी असते.
विड्याच्या पानाची शेती प्रामुख्याने उष्ण व दमट हवामानात चांगली वाढते. या पिकासाठी सावलीची आवश्यकता असते, त्यामुळे पानाचे मांडव (पानतंबू) तयार करून लागवड केली जाते. जमीन सुपीक, सेंद्रिय घटकांनी समृद्ध आणि पाणी न साचणारी असावी. पानाची लागवड प्रामुख्याने काड्यांपासून म्हणजे कलम करून केली जाते.
लागवडीनंतर पानाच्या वेलींची नियमित निगा राखणे आवश्यक असते. योग्य वेळी पाणी देणे, तण काढणे, सेंद्रिय खते वापरणे आणि रोग-कीड नियंत्रण करणे या गोष्टी महत्त्वाच्या असतात. पानाचे पीक अतिशय नाजूक असल्यामुळे त्यावर विशेष लक्ष द्यावे लागते.
भांडवली खर्च
विड्याच्या पानाच्या शेतीसाठी मांडव उभारावा लागत असल्यने इतर पिकांच्या तुलनेत थोडी खर्चिक असते.
अंदाजे खर्च (एक एकरासाठी):
मांडव बांधणी : सुमारे एक ते दीड लाख रुपये
लागवडीसाठी काड्या (रोपे): सुमारे वीस ते तीस हजार रुपये
सेंद्रिय खते व औषधे : पंधरा ते वीस हजार रुपये
मजुरी खर्च : वीस ते तीस हजार रुपये
एकूण प्रारंभिक गुंतवणूक: अंदाजे दीड ते दोन लाख रुपये. हा खर्च प्रदेशानुसार बदलू शकतो
उत्पादन व उत्पन्न
लागवडीनंतर साधारण तीन ते चार महिन्यांत काढणी सुरू होते. एकदा लागवड केल्यावर तीन ते पाच वर्षे उत्पादन मिळू शकते. दर आठवड्याला किंवा पंधरवड्याला पाने तोडली जातात. चांगल्या व्यवस्थापनात वर्षाला दोन ते चार लाख रुपये उत्पन्न मिळू शकते.
विक्री व बाजारपेठ
पानाला वर्षभर मागणी असल्यामुळे विक्रीची अडचण सहसा येत नाही. यांची विक्री स्थानिक बाजारपेठ, घाऊक व्यापारी, पानमळे, लग्नसमारंभ, पूजाविधी यासाठी थेट विक्री करता येते. पानांची गुणवत्ता (आकार, रंग, ताजेपणा) जितकी चांगली, तितका जास्त दर मिळतो.
नफा वाढवण्यासाठी टिप्स
सेंद्रिय शेती केल्यास मागणी वाढते. पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे. थेट ग्राहकांना विक्री केल्यास जास्त नफा मिळतो. पानांचे योग्य पॅकिंग आणि साठवण महत्त्वाची
विड्याच्या खायच्या पानाची शेती ही सुरुवातीला खर्चिक असली तरी दीर्घकाळात स्थिर आणि चांगले उत्पन्न देणारी शेती आहे. योग्य नियोजन, काळजी आणि बाजारपेठेची माहिती असल्यास हा व्यवसाय अत्यंत फायदेशीर ठरू शकतो.