पालघरच्या विद्यार्थ्यांना दुहेरी पदवीची संधी
मुंबई विद्यापीठ अंतर्गत दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आता पालघर येथे सुरू झाला आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. सोनोपंत दांडेकर महाविद्यालय येथे विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचे उपविभागीय केंद्र सुरू करण्यात आले आहे. नियमित शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना एकाच वेळी दुहेरी पदवी प्राप्त करण्याची संधी देणारा हा राज्यातील पहिलाच प्रयोग असल्याचे सांगण्यात आले.
या केंद्राच्या स्थापनेसाठी करण्यात आलेल्या सामंजस्य करारावर दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक प्रा. डॉ. शिवाजी सरगर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. कार्यक्रमाला जनसंपर्क अधिकारी डॉ. लीलाधर बनसोड, संस्थेचे अध्यक्ष सीए सचिन कोरे, सुधीर दांडेकर, धनेश वर्तक, मंगेश पंडित, अनिल पाटील, सुधीर कुलकर्णी तसेच उपप्राचार्य महेश देशमुख उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच नव्या कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेता येणार आहे. जागतिक स्तरावरील विद्यापीठांमध्ये ऑनलाईन शिक्षणाचा वाढता वापर लक्षात घेऊन भारतीय विद्यार्थ्यांनाही अशा आधुनिक अभ्यासक्रमांची उपलब्धता करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मान्यवरांनी स्पष्ट केले. बदलत्या शैक्षणिक आणि औद्योगिक गरजांनुसार विद्यार्थ्यांमध्ये नव्या अभ्यासक्रमांविषयी मोठी उत्सुकता निर्माण होत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
या नव्या व्यवस्थेमुळे नियमित पदवी शिक्षण सुरू असतानाच विद्यार्थ्यांना दुसरी पदवी घेणे शक्य होणार आहे. तसेच शिक्षण पूर्ण झालेल्या नागरिकांनाही व्यवस्थापन, सायबर सुरक्षा आणि इतर विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकण्याची संधी मिळणार आहे. विशेषतः औद्योगिक क्षेत्रात कार्यरत कामगार, अधिकारी आणि नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी हा उपक्रम अत्यंत लाभदायी ठरणार असल्याचे सांगण्यात आले. प्रवेश आणि परीक्षा शुल्क नाममात्र ठेवण्यात येणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण अधिक सुलभ आणि परवडणारे होणार आहे.
कार्यक्रमात बोलताना डॉ. किरण सावे आणि सीए सचिन कोरे यांनी या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. याशिवाय विद्यापीठाच्या विविध कौशल्याधारित अभ्यासक्रमांची सुविधा पालघरमध्ये उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. डॉ. शिवाजी सरगर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने डिजिटल शैक्षणिक सामग्री निर्मितीची गरज अधोरेखित करत दुहेरी पदवीची संधी विद्यार्थ्यांना अधिक उच्च शिक्षणासाठी प्रेरित करेल, असे मत व्यक्त केले. शिक्षणासोबत छंद आणि आवड जोपासण्याची संधी मिळेल तसेच रोजगारक्षमतेत वाढ होऊन उद्योगक्षेत्राला आवश्यक तंत्रज्ञानसज्ज मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.