अल बारेह वाऱ्यांमुळे अमिरातीत धुळीचे संकट

संयुक्त अरब अमिरातीमध्ये ‘अल बारेह’ नावाच्या वाऱ्याचा प्रभाव वाढल्याने अनेक भागांत वातावरण अत्यंत धूसर झाले आहे. राष्ट्रीय हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, जोरदार वाऱ्यांमुळे वाळू आणि धूळ हवेत उडत असून रस्त्यांवरील दृश्यमानता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. विशेषतः अबुधाबी, दुबई आणि उत्तर अमिराती भागात या परिस्थितीचा अधिक परिणाम जाणवत असून नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हवामान विभागाने सांगितले की, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि बदलत्या वाऱ्यांच्या दिशेमुळे वारे वेगाने वाहत आहेत. काही ठिकाणी वाऱ्यांचा वेग ताशी चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे खुल्या भागात धुळीचे मोठे ढग निर्माण होत असून वाहनचालकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समुद्रकिनारी भागांतही वातावरण अस्थिर झाले असून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या गंभीर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हवामानातील बदलामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, बाहेर पडताना तोंड आणि डोळ्यांचे संरक्षण करावे. तसेच वाहन चालविताना वेग कमी ठेवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. धुळीमुळे श्वसनासंबंधी त्रास होण्याची शक्यता असल्याने लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे.

अमिरातीतील अनेक भागांत दिवसाचे तापमान चढ-उतार करत असून काही ठिकाणी ढगाळ वातावरणही दिसून येत आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस धुळीचे वारे कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. काही किनारी आणि वाळवंटी भागांत दृश्यमानता अत्यंत कमी होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने सातत्याने हवामानविषयक सूचना तपासण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

दरम्यान, पश्चिम आशियातील इतर देशांनाही या अस्थिर हवामानाचा मोठा फटका बसत आहे. ओमानमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी जीवितहानीचीही नोंद झाली आहे. सौदी अरेबियातही धुके, धूळ आणि पावसाबाबत नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण आखाती प्रदेशात हवामानाचा गंभीर परिणाम दिसून येत असल्याचे चित्र आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
15,095 वेळा पाहिलं