
भारतीय हवाई दलाने उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्याजवळ असलेल्या पूर्वांचल द्रुतगती मार्गावर एक थरारक आणि महत्त्वाचा सराव यशस्वीपणे पूर्ण केला आहे. या सरावादरम्यान हवाई दलाच्या ताफ्यातील प्रमुख लढाऊ विमाने जग्वार आणि मिराज यांनी द्रुतगती मार्गाच्या धावपट्टीवर यशस्वी उड्डाण केले. तसेच द्रुतगती मार्गावर यशस्वीरित्या विमान उतरवले. आपत्कालीन स्थितीत द्रुतगती मार्गांचा वापर विमानांसाठी धवपट्टी म्हणून करण्याच्या भारताच्या धोरणांतर्गत हा सराव अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
सुलतानपूर जिल्ह्यातील कूरेभार येथे महामार्गावर बांधण्यात आलेल्या तीन पूर्णांक दोन किलोमीटर लांबीच्या विशेष धावपट्टीवर हा सराव पार पडला. दुपारी साधारण बाराच्या सुमारास आकाशातून झेप घेत लढाऊ विमाने महामार्गावर उतरली. खोलवर मारा करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या जग्वार विमानाने अतिशय अचूकतेने महामार्गाला स्पर्श केला आणि पुन्हा आकाशात झेप घेतली. कारगिल युद्धातील नायक असलेल्या मिराज-२००० विमानानेही आपल्या वेगाचे आणि नियंत्रणाचे प्रदर्शन केले. विमानांच्या सुरक्षेसाठी धावपट्टीच्या दोन्ही बाजूंना अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका तैनात होत्या.
भारताने सीमेवरील वाढता तणाव आणि शत्रूराष्ट्रांचे हवाई हल्ले लक्षात घेऊन देशभरातील प्रमुख महामार्गांवर अशा आपत्कालीन धावपट्ट्या विकसित केल्या आहेत. युद्धाच्या काळात जर शत्रूने हवाई दलाच्या मुख्य तळांवर आणि धावपट्ट्यांवर हल्ले केले, तर विमाने उतरवण्यासाठी हे महामार्ग पर्यायी धावपट्टी म्हणून वापरले जाऊ शकतात. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जेव्हा विमाने मुख्य तळांवर उतरू शकत नाहीत, तेव्हा या महामार्गांचा वापर करून तातडीची मदत पोहोचवता येते. पूर्वांचल द्रुतगती मार्ग हा दिल्ली-लखनौ ते थेट बिहारच्या सीमेपर्यंत जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे, ज्यामुळे तो धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत मोलाचा ठरतो. या सरावासाठी पूर्वांचल द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही तासांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. उत्तर प्रदेश सरकारने यासाठी हवाई दलाला सर्वतोपरी सहकार्य केले. द्रुतगती मार्गाच्या धावपट्टीवर कोणताही कचरा किंवा दगड राहू नये म्हणून हवाई दलाच्या जवानांनी ती पूर्णपणे स्वच्छ केली होती, कारण इंजिनमध्ये एखादा छोटा खडा गेल्यास विमानाचे नुकसान होऊ शकते. हा सराव पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी गर्दी केली होती, मात्र त्यांना सुरक्षित अंतरावर रोखून धरण्यात आले होते.
उत्तर प्रदेशातील द्रुतगती मार्गावर अशा प्रकारचे सराव आता नियमित होऊ लागले आहेत. याआधी आग्रा-लखनौ द्रुतगती मार्ग आणि यमुना द्रुतगती मार्गावरही सुखोई-तीस एमकेआय आणि सी-एकशे तीस जे सुपर हर्क्युलिस यांसारखी विमाने उतरवण्यात आली आहेत. सध्याच्या सरावाद्वारे भारतीय हवाई दलाने हे सिद्ध केले आहे की, ते कोणत्याही भौगोलिक परिस्थितीत आणि कोणत्याही वेळेत शत्रूचा मुकाबला करण्यास सज्ज आहेत.