अकरावीच्या प्रवेशासाठी पाच फेऱ्या
राज्य शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यंदाची प्रवेश प्रक्रिया अधिक सुटसुटीत, पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी पाच फेऱ्यांचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, प्रवेशासाठी होणारी धावपळ कमी होणार आहे.
यंदाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार असून, त्यामध्ये एकूण पाच फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. दहावीच्या निकालानंतर गुणांच्या गुणवत्तेनुसार पहिल्या तीन फेऱ्या पार पडतील. चौथी खुली फेरी ही पहिल्या तीन फेऱ्यांनंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठी सर्वांसाठी खुली असेल. यंदाच्या वेळापत्रकाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मुलींसाठी राखीव असलेली विशेष फेरी. मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात अधिक संधी मिळाव्यात आणि त्यांच्या आवडीचे महाविद्यालय मिळावे, यासाठी ही स्वतंत्र फेरी घेतली जाईल.
शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, प्रवेशाची प्रक्रिया कितीही लांबली तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही. नोंदणी १० एप्रिल २०२६ पासून सुरू झाली आहे. महाविद्यालयांमध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक प्रवेश पूर्ण झाले आहेत, अशा ठिकाणी १५ जुलै २०२६ किंवा त्यापूर्वी अकरावीचे शैक्षणिक वर्ग सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनेकदा विद्यार्थी एकदा प्रवेश घेतल्यानंतरही पुन्हा पुन्हा केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत सहभागी होतात, ज्यामुळे जागा अडकून पडतात. हे टाळण्यासाठी यंदा अर्ज मागे घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे खऱ्या अर्थाने गरजू विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर प्रवेश मिळणे सोपे होईल. प्रवेशाचे नियम स्पष्ट करताना विभागाने म्हटले आहे की, सर्व प्रवेश केवळ दहावीच्या पाच विषयांच्या सर्वोत्तम गुणांच्या आधारे आणि ऑनलाइन प्रणालीद्वारेच होतील. कोटा या जागांची माहितीही ऑनलाइन पोर्टलवर भरणे अनिवार्य आहे. प्रवेशासाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांनी दहावीचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला आणि आरक्षण हवे असल्यास जातीचे प्रमाणपत्र व नॉन-क्रीमी लेअर सर्टिफिकेट तयार ठेवणे आवश्यक आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.