भारत – बांगलादेशच्या गुप्तहेर प्रमुखांची महत्त्वाची सुरक्षा बैठक

बांगलादेशमध्ये अलीकडेच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश राष्ट्रीय पक्षाचा विजय झाला. तारीक रेहमान यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. हे नवे सरकार सत्तेत येताच भारत आणि बांगलादेशच्या सुरक्षा संबंधांमध्ये एक महत्त्वाची हालचाल दिसून येत आहे. दोन्ही देशांच्या गुप्तचर यंत्रणांच्या प्रमुखांनी नुकतीच दिल्लीत भेट घेऊन द्विपक्षीय सुरक्षा विषयांवर सविस्तर चर्चा केली आहे.

बांगलादेशची सर्वोच्च संरक्षण गुप्तचर संस्था असलेल्या लष्करी गुप्तचर संचालनालयचे महासंचालक मेजर जनरल कैसर रशीद चौधरी यांनी एक ते तीन मार्च दरम्यान दिल्लीचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी भारताच्या रॉचे प्रमुख पराग जैन आणि लष्करी गुप्तचर संस्थेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल आरएस रमण यांची भेट घेतली. तारीक रेहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर केवळ पाच दिवसांतच, २२ फेब्रुवारी रोजी कैसर रशीद यांची लष्करी गुप्तचर संचालनालयाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतरची ही त्यांची पहिली महत्त्वाची भारत भेट मानली जात आहे.

दोन्ही देशांच्या गुप्तचर प्रमुखांनी खासगी स्नेहभोजनाच्या निमित्ताने भेट घेतली. दोन्ही देशांच्या सीमेवरील सुरक्षेच्या दृष्टीने गुप्त माहितीची परस्पर देवाणघेवाण करणे, भविष्यातील संभाव्य सुरक्षा धोके आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी सहकार्य वाढवणे, यावर यावेळी चर्चा करण्यात आली. बांगलादेशमध्ये काही काळापासून सक्रिय असलेल्या भारतविरोधी कारवायांबद्दल केंद्र सरकारने यापूर्वीच तीव्र चिंता व्यक्त केली आहे. नव्या सरकारसोबत या मुद्यावर काम करण्यास भारत उत्सुक आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या काळात बांगलादेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची जी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती, त्याचे मूल्यांकन या बैठकीत करण्यात आले. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना पदच्युत केल्यानंतरच्या काळात तिथे मोठी अस्थिरता निर्माण झाली होती. विशेषतः अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समुदायावर मोठ्या प्रमाणावर अत्याचार झाले. डिसेंबर २०२५ मध्ये अनेक हिंदू नागरिकांची जमावाकडून हत्या करण्यात आली होती, ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, आठ मार्च रोजी एक महत्त्वाची कारवाईही झाली. बांगलादेशमधील विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याच्या हत्येप्रकरणी दोन बांगलादेशी नागरिकांना विशेष कार्य दलाने पश्चिम बंगालमधून अटक केली. उस्मान हादीवर डिसेंबर २०२५ मध्ये ढाका येथे गोळीबार झाला होता आणि उपचारादरम्यान सिंगापूरमध्ये त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर बांगलादेशमध्ये मोठा हिंसाचार उसळला होता.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
420 वेळा पाहिलं