हवाईत पुन्हा किलावा ज्वालामुखीचा उद्रेक

जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक असलेल्या हवाईच्या किलावा ज्वालामुखीचा पुन्हा एकदा भीषण उद्रेक झाला आहे. २९ एप्रिल २०२६ रोजी सुरू झालेल्या या उद्रेकामुळे संपूर्ण परिसरात लाव्हारसाचे डोंगर आणि कारंजे पाहायला मिळत आहेत. अमेरिकन भूगर्भ सर्वेक्षण संस्थेने या घटनेचे थरारक व्हिडिओ प्रसिद्ध केले असून, परिसरातील धोक्याची पातळी वाढवली आहे.

किलावा ज्वालामुखीच्या माथ्यावर असलेल्या हॅलेमॅमऊ विवरातून लाव्हारसाचे लोट बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. भूगर्भ शास्त्रज्ञांच्या मते, हा उद्रेक अत्यंत वेगवान असून लाव्हारसाचे कारंजे कित्येक फूट उंचीपर्यंत उडत आहेत. हवाई ज्वालामुखी राष्ट्रीय उद्यानाच्या आत असलेल्या या विवरात लाव्हारसाचे तळे तयार झाले असून त्यातून विषारी वायूंचे उत्सर्जन होत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने विमान वाहतुकीसाठी लाल इशारा जाहीर केला आहे. ज्वालामुखीच्या धुळीचे कण आणि विषारी वायू हवेत पसरल्यामुळे विमानांच्या इंजिनांना धोका निर्माण होऊ शकतो. तसेच, स्थानिक प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना सुरक्षित अंतरावर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.  ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे मोठ्या प्रमाणात सल्फर डायऑक्साइड वायू बाहेर पडत आहे. हा वायू हवेतील आर्द्रतेशी मिसळून वायू तयार करतो, ज्यामुळे मानवी श्वसनसंस्थेला त्रास होऊ शकतो आणि पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असते. शास्त्रज्ञ सध्या वायूच्या उत्सर्जनाच्या प्रमाणावर सतत लक्ष ठेवून आहेत.

किलावा हा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असला तरी, सध्याची परिस्थिती अत्यंत अनिश्चित आहे. लाव्हारसाचा प्रवाह कोणत्याही क्षणी दिशा बदलू शकतो किंवा जमिनीला भेगा पडून नवीन छिद्रांमधून लाव्हा बाहेर येऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रीय उद्यानामधील काही भाग पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत.  स्थानिक अधिकारी परिस्थितीवर चोवीस तास देखरेख ठेवून आहेत. किलावा ज्वालामुखीचा हा उद्रेक निसर्गाच्या रौद्र रूपाची प्रचिती देणारा असून, शास्त्रज्ञांसाठी हा संशोधनाचा विषय ठरत आहे. मात्र, सामान्य जनतेसाठी सुरक्षितता हाच सध्याचा प्राधान्यक्रम आहे.






1,173 वेळा पाहिलं