कोल्हापूरच्या अंबाबाईचा गाभारा भक्तांसाठी खुला
कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्याची संवर्धन प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. गेली चार दिवस बंद असलेला मंदिराचा मुख्य गाभारा बुधवारपासून पुन्हा भाविकांच्या दर्शनासाठी खुला करण्यात आला आहे.
अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत पहिल्या टप्प्यातील जतन आणि संवर्धनाची कामे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. यामध्ये पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली गाभाऱ्यातील दगडी भिंतींचे संवर्धन करण्यात आले. मंदिर परिसरातील छोटी मंदिरे, शिल्पाकृती आणि दगडी फरशीचे नूतनीकरण करण्यात आले. संवर्धन प्रक्रियेदरम्यान अंबाबाईसह श्री महाकाली आणि श्री महासरस्वती यांच्या गाभाऱ्यातील अंतर्गत आणि बाह्य भागांची शास्त्रीय पद्धतीने तपासणी करण्यात आली. १४ मार्चपासून ही प्रक्रिया सुरू झाल्याने मुख्य गाभारा पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. सुरुवातीला हे काम १७ मार्चपर्यंत चालणार होते, परंतु अधिक बारकाव्याने काम करण्यासाठी संवर्धन प्रक्रिया एक दिवसाने वाढवण्यात आली होती. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता गाभाऱ्यात विशेष धार्मिक विधी करण्यात आले. यामध्ये देवीच्या मूळ मूर्तीवर अभिषेक करण्यात आला, त्यानंतर विधिवत पूजा आणि आरती झाली. हे धार्मिक सोपस्कार पार पडल्यानंतर सकाळी साडेदहाच्या सुमारास भाविकांसाठी मुख्य दर्शन पूर्ववत सुरू करण्यात आले.
गाभारा बंद असताना भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने पेटी चौकात उत्सवमूर्ती आणि मंगल श्रीकलशाची स्थापना केली होती. या काळात अभिषेक आणि इतर नैमित्तिक विधी याच ठिकाणी पार पडले.