एलपीजी टंचाईचा शालेय पोषण आहाराला फटका

एलपीजी गॅस सिलिंडरच्या तुटवड्याचा गंभीर परिणाम आता महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभागावर होऊ लागला आहे. राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेला म्हणजेच शालेय पोषण आहाराला टंचाईची मोठी झळ बसली आहे. अनेक शाळांमध्ये गॅसअभावी पुन्हा एकदा लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्र राज्यातील पहिली ते आठवीच्या सुमारे एकोणनव्वद लाख विद्यार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून दररोज दुपारचे भोजन दिले जाते. विद्यार्थ्यांचे कुपोषण रोखणे आणि त्यांची शाळेतील उपस्थिती टिकवून ठेवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे या कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या भोजनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागासोबतच आता शहरी भागांतही सिलिंडर मिळवण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

चुलीवर स्वयंपाक आणि शिक्षकांची चिंता अनेक शाळांमध्ये बचत गट किंवा केंद्रीय स्वयंपाकघरामार्फत आहार शिजवला जातो. मात्र, गॅस संपल्यामुळे आणि नवीन सिलिंडर वेळेत मिळत नसल्यामुळे नाईलाजाने शाळांच्या आवारात किंवा मोकळ्या जागेत चुली पेटवाव्या लागत आहेत. यामुळे धुराचा त्रास होण्यासोबतच पावसाळ्यात किंवा वारे असताना स्वयंपाक करणे कठीण जात आहे. मुंबई अध्यापक संघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. पोषण आहाराची दैनंदिन माहिती सरकारला ऑनलाइन पोर्टलवर भरावी लागते. जर गॅसअभावी आहार दिला गेला नाही, तर त्याची नोंद पोर्टलवर करता येणार नाही, ज्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होतील आणि याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवरही होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे पुणे उपाध्यक्ष नितीन मेमाणे यांनी सांगितले की, युद्धपरिस्थितीमुळे ही समस्या उद्भवली असली तरी, शासनाने यात तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज आहे. शाळांना आणि पोषण आहार राबवणाऱ्या बचत गटांना प्राधान्याने सिलिंडरचा पुरवठा करण्याचे निर्देश तेल कंपन्यांना द्यावेत, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. या संदर्भात राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे की, शासन स्तरावर या परिस्थितीचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. शाळांना सिलिंडर उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू असून, टंचाई दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
13,370 वेळा पाहिलं